व्यापाऱ्याचे १६२ तोळे सोने घेऊन आरोपी पसार; फोन बंद लागल्याने संशय, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 10:16 AM2024-08-16T10:16:09+5:302024-08-16T10:20:49+5:30
झवेरी बाजारातील व्यापाऱ्याचे ९७ लाख रुपयांचे १६२ तोळे सोने घेऊन व्यापारी पसार झाल्याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : झवेरी बाजारातील व्यापाऱ्याचे ९७ लाख रुपयांचे १६२ तोळे सोने घेऊन व्यापारी पसार झाल्याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.हितेश सिंह असे आरोपी व्यापाऱ्याचे नाव असून, त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात गुजरातच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
झवेरी बाजारातील व्यापारी जितेंद्रसिंह राव यांच्या आरोपावरून दादर येथील सोने व्यापारी हितेश सिंहविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हितेश याच्याशी गावापासून ओळख असल्याने त्याच्यासोबत राव यांनी व्यवहार सुरू केला. हितेश हा दागिन्यांच्या बदल्यात शुद्ध सोने देत असे. गेल्या वर्षी जूनमध्ये हितेश हा राव यांच्या कार्यालयात आला. त्याने राव यांना सोन्याचे दागिने बनवून देण्याची विनंती केली. त्यानुसार, राव यांनी सुरुवातीला पाच तोळे सोन्याचे दागिने बनवून दिले. १० दिवसांत त्याचे पैसे मिळाले. पुढे साडेसहा तोळ्याचे दागिने बनवून देत त्याचेही पैसे वेळेवर दिल्याने त्याच्यावर विश्वास बसला.
फोन बंद लागल्याने संशय-
१५ मार्च रोजी हितेशने सोन्याच्या चेन, मंगळसूत्र व कानातील रिंग बनविण्यास सांगितल्या. त्यानुसार, एकूण १६१७.७४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बनवून दिले. ५ एप्रिलला दागिने घेऊन गेल्यानंतर १५ दिवसांत पैसे देणार असल्याचे सांगितले. मात्र, १५ दिवस उलटूनही पैसे मिळाले नाही. त्यानंतर, त्याचा फोन बंद लागल्याने त्यांना संशय आला.
गावी चौकशी करताच, हितेशला गुजरात गुन्हे शाखेने अटक केल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. तो न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती मिळाली. अखेर, फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच, त्यांनी पोलिसांत घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास करत आहे.