Join us  

मनपाकडून रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई; ६ महिन्यांत गॅस्ट्रोचे ३४७८ रुग्ण 

By संतोष आंधळे | Published: June 12, 2024 10:01 AM

पावसाळ्यात पोटाच्या आजाराने त्रस्त असलेल्यांची संख्या झपाट्याने वाढते.

संतोष आंधळे, मुंबई : पावसाळ्यात पोटाच्या आजाराने त्रस्त असलेल्यांची संख्या झपाट्याने वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे दूषित पाणी ! यामुळे रुग्णांना पोटाच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. याकडे वेळीच लक्ष न दिल्याने पोटदुखीचा आजार बळावतो. गेल्या सहा महिन्यांत गॅस्ट्रोचे तीन हजार ४७८ रुग्ण आढळले आहेत. उघड्यावरील आणि रस्त्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे हा आजार वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

शहरात सर्रासपणे रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाल्ले जातात. पालिकेचा आरोग्य विभाग या काळात रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करत असतो. मात्र, तरीही राजरोसपणे हे पदार्थ विकले जातात. अनेकवेळा या पदार्थांच्या ठिकाणी माशा घोंगावत असतात. त्यामुळे हे पदार्थ दूषित होण्याची शक्यता अधिक असते. शीतपेय किंवा चटण्या तयार करण्यासाठी ज्या पाण्याचा वापर होतो, ते पाणी दूषित असेल तर पोटाचा संसर्ग होतो. अतिसार, उलट्या होऊन रुग्णांना अशक्तपणा येतो, असे डॉक्टरांनी सांगितले.

लक्षणे-

पोट फुगणे, उलट्या होणे, अशक्तपणा येणे, भूक न लागणे, अतिसार, चक्कर येणे.या आजारामध्ये सतत पोटात जळजळ होत असते.

पावसाळ्याच्या काळात शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाणे टाळले पाहिजे. पाणी दूषित असल्यास पाण्यातून जंतूंचा प्रवेश पोटात होऊ शकतो. त्यामुळे पोटाच्या विविध प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागते. कोणतेही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही, अशावेळी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. गरम पदार्थ खावेत. - डॉ. प्रवीण राठी,  विभागप्रमुख, पोटविकार, नायर रुग्णालय 

टॅग्स :मुंबईनगर पालिकाआरोग्यमोसमी पाऊस