मुंबई : डी. एन. नगर ते दहिसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ‘मेट्रो ७’ मार्गिकेवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. नवीन गाडीमुळे आणखी २४ फेऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे आता दररोज एकूण २८२ फेऱ्यांद्वारे या मार्गिकेवर प्रवाशांना सेवा दिली जात आहे. परिणामी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मेट्रो मार्गिकेवरील प्रवाशांच्या संख्येत वाढ होते. यंदा या दोन्ही मेट्रो मार्गिकांनी मिळून दैनंदिन २ लाख ६० हजार प्रवाशांचा टप्पा गाठला आहे. कार्यालयीन वेळेत या मेट्रो मार्गिकांवर प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होते. त्यामुळे गर्दीच्या वेळी कोंडी होऊन प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागू नये, यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या सेवेत आणखी एक गाडी दाखल केली आहे. त्यामुळे आता या मार्गावर एकूण २४ गाड्या धावत असून, मेट्रोच्या दोन फेऱ्यांमधील अंतर साडेसात मिनिटांवरून सात मिनिटांवर आले आहे.
१) दर ७ मिनिटांनी गाडी- २,६०,४७१ सध्याची सर्वाधिक प्रवासी संख्या
२) दोन्ही मार्गिकेवरील स्थानके- ३०
३) मेट्रो गाड्यांद्वारे सुरू आहे सेवा- २४
आणखी तीन गाड्या राखीव-
पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीत भर पडल्यास प्रवासी मेट्रोला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे मेट्रो स्थानकांवर अचानक गर्दी वाढल्यास अतिरिक्त गाड्या सोडून गर्दी नियंत्रणात आणता यावी, यासाठीही महामुंबई मेट्रो प्रशासनाने तयारी केली आहे. त्यासाठी चारकोप येथील कारडेपोमध्ये आणखी तीन गाड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
प्रवासी संख्या वाढण्याची अपेक्षा-
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका सुरू झाल्यापासून आतापर्यंत १० कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. तब्बल दोन वर्षे आणि दोन महिन्यांच्या कालावधीत या मेट्रो मार्गिकेने ही कामगिरी केली आहे. त्यानंतरही प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या या मेट्रो मार्गिकेवरून दररोज २ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करत असून त्यात आणखी वाढीची अपेक्षा महामुंबई मेट्रोकडून व्यक्त केली जात आहे. ‘मेट्रो २ बी’ आणि ‘मेट्रो ९’ मार्गिकेची जोडणी मिळाल्यानंतर प्रवासी संख्या वाढेल, अशी अपेक्षा अधिकारी व्यक्त करत आहेत.