Join us  

'मेट्रो ३' च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रशासनाचे एक पाऊल पुढे; ‘CMRS’कडे तपासणीसाठी अर्ज करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 10:48 AM

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाची तपासणी अग्निशमन विभागाने पूर्ण केली आहे.

मुंबई : कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाची तपासणी अग्निशमन विभागाने पूर्ण केली आहे. त्यामुळे या मार्गिकेच्या तपासणीसाठी कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) पथकाला बोलावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) सीएमआरएस पथकाला तपासणीसाठी पाचारण करण्याकरिता पुढील आठवड्यात अर्ज सादर केला जाणार आहे. 

विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मेट्रो ३ मार्गिकेचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून तयारी सुरू आहे. त्यानुसार सीएमआरएस पथकाला मेट्रो मार्गिकेची तपासणी करण्यासाठी जुलैच्या मध्यावर पाचारण केले जाणार होते. मात्र, जुलै उलटला तरी अद्याप हे पथक तपासणीसाठी दाखल झालेले नाही. तसेच, अग्निशमन विभागाने अग्नी सुरक्षेचे ना-हरकत प्रमाणपत्र दिले नव्हते. मेट्रो ३ मार्गिकेच्या तीन स्थानकांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. 

९७ टक्के कामे पूर्ण-

१) मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील मार्गाची ९७ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. अग्निशमन विभागाने मेट्रो मार्गिकेची तपासणी पूर्ण केली आहे. 

२) तसेच, पहिल्या टप्प्यातील स्थानकांच्या इलेक्ट्रिक आणि अन्य यंत्रणेची तपासणी अंतिम टप्प्यात आहे. 

३) ही तपासणीही लवकरच पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन सीएमआरएस पथकाला आमंत्रित करण्यासाठी पुढील आठवड्यात अर्ज करणार आहे. 

या स्थानकांवर मेट्रो धावणार-

आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २, सहार रोड, विमानतळ टर्मिनल १, सांताक्रुझ, विद्यानगरी, बीकेसी.

स्थानकातील मालमत्तेचे नुकसान-

१) कंत्राटदाराने मान्सूनच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी न घेतल्याने हा प्रकार घडला. त्यातून नव्याने उभारणी सुरू असलेल्या मेट्रो स्थानकातील मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आले होते. 

२) त्यामुळे विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी ही मेट्रो सुरू होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. 

टॅग्स :मुंबईमेट्रोकुलाबा