मोनोच्या डब्यांवर झळकणार जाहिराती; उत्पन्न वाढविण्याचा मेट्रोचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 10:45 AM2024-09-10T10:45:06+5:302024-09-10T10:46:48+5:30

आर्थिक तोट्यातील मोनो मार्गिकेवरून उत्पन्न मिळवण्यासाठी महामुंबई मेट्रो संचलन मंडळ (एमएमएमओसीएल) कडून विविध प्रयत्न सुरू आहेत.

in mumbai advertisements will appear on mono boxes metro effort to increase revenue | मोनोच्या डब्यांवर झळकणार जाहिराती; उत्पन्न वाढविण्याचा मेट्रोचा प्रयत्न

मोनोच्या डब्यांवर झळकणार जाहिराती; उत्पन्न वाढविण्याचा मेट्रोचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आर्थिक तोट्यातील मोनो मार्गिकेवरून उत्पन्न मिळवण्यासाठी महामुंबईमेट्रो संचलन मंडळ (एमएमएमओसीएल) कडून विविध प्रयत्न सुरू आहेत. आता त्याचाच भाग म्हणून मोनो गाडीच्या डब्यांवर बाहेरील आणि आतील बाजूला जाहिराती लावण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. त्यातून उत्पन्नाचे नवे स्रोत उभारण्याचा एमएमएमओसीएलचा प्रयत्न आहे.  चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनो मार्गिकेची लांबी २० किमी असून, त्यावर १८ स्थानके आहेत. 

सद्यस्थितीत या मोनो मार्गिकेवर ८ गाड्यांद्वारे सेवा दिली जात असून, त्यातील ६ गाड्या प्रत्यक्ष मार्गावर चालवल्या जात आहेत. तर एक गाडी आवश्यकतेनुसार गरजेसाठी डेपोमध्ये ठेवली आहे, तर दुसरी गाडी दुरुस्तीसाठी डेपोत पाठवली जाते. सध्या या मार्गावरून दर १५ मिनिटांनी गाडी धावत असून, त्यातून सुमारे १८ हजार प्रवासी प्रवास 
करत आहेत. 

अन्य मार्गातूनही उत्पन्न मिळविण्याचे प्रयत्न सुरू-

मोनो मार्गिकेवरील सर्व स्थानकांवरील नावांच्या हक्कांची विक्री आणि स्थानकांवरील मोकळ्या जागांवरील जाहिरातीतूनही उत्पन्न मिळवण्याचा एमएमएमओसीएलचा प्रयत्न आहे. त्यासाठीही हालचाली सुरू आहेत.

तोटा कमी करण्यासाठीप्रयत्न -

मात्र, प्रवाशांच्या तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा मार्गिकेच्या संचलनाचा खर्च अधिक असल्याची स्थिती आहे. त्यामुळे या मोनो मार्गिका चालविण्याचा भार एमएमआरडीएच्या माथी आला आहे. आता मोनोचा तोटा कमी करण्याच्या दृष्टीने अन्य मार्गांद्वारे उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न आहे. 

१) चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशी २० किमी लांबी.

२) एकूण स्थानके - १८ 

३) मोनो उभारणीसाठी ३०२५ कोटी रुपयांचा भांडवली खर्च.

४) मोनो मार्गावर अपेक्षित प्रवासी संख्या दरदिवशी दीड लाख ते दोन लाख.

पाच वर्षांसाठी कंत्राट देणार -

१) मोनो मार्गावर आता नव्याने आणखी १० गाड्या दाखल होणार आहेत. 

२) या एकूण १८ गाड्यांवर आणि आतील बाजूला जाहिराती लावण्याच्या अनुषंगाने एमएमएमओसीएलकडून कंत्राट दिले जाणार आहे. 

३) या १८ गाड्यांतील ९३०० चौरस मीटर जागेवर या जाहिराती लावता येणार आहेत. 

४) पाच वर्षांच्या कालावधीसाठी हे कंत्राट दिले जाणार आहे. यात कंत्राटदाराला ठराविक रक्कम एमएमएमओसीएलला द्यावी लागणार आहे.

Web Title: in mumbai advertisements will appear on mono boxes metro effort to increase revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.