मुंबई :बेस्ट उपक्रमाने शुक्रवारपासून शहरातील कोस्टल रोडवरून नरिमन पॉइंट आणि भायखळा स्थानकांदरम्यान वातानुकूलित बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ८:०० वाजल्यापासून ते रात्री ९:०० पर्यंत बस प्रवाशांना या बससेवेचा लाभ घेता येणार आहे. या बसचे भाडे ६ ते १९ रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले असून, ते सामान्य नागरिकांना परवडणारे आहे. त्यामुळे वेगवान आणि गारेगार प्रवासाचा आनंद सामान्य मुंबईकरांना अनुभवता येणार आहे.
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा (कोस्टल रोड) मार्गाचे काम सुरू होण्याच्या आधीपासून बस व रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्गिकेचे नियोजन करण्यात आले होते. या मार्गावर अवजड वाहने, दुचाकी, तीन चाकी आणि पादचाऱ्यांना प्रवेश नसल्याने या मार्गावरून जायचे असल्यास केवळ स्वत:चे चारचाकी वाहन किंवा टॅक्सीचाच पर्याय उपलब्ध आहे. बेस्टमुळे सर्वसामान्यांनाही या मार्गावरून प्रवास करणे शक्य झाले असते. मात्र, सध्या या मार्गाचा थोडासा भाग सुरू झाला असून, संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर ‘बेस्ट’ बसमार्ग ठरवले जातील, असे ‘बेस्ट’कडून सांगितले जात होते. अखेर मरिन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतची कोस्टल रोडची उत्तर मार्गिका गुरुवारी खुली झाल्यानंतर ‘बेस्ट’कडून शुक्रवारपासून बस सेवा सुरू करण्याचाच निर्णय झाला. संपूर्ण आठवडाभर या मार्गाने बस धावणार आहेत.
...असा असणार मार्ग
१) बस मार्ग क्रमांक- ए ७८ - एनसीपीए (नरिमन पॉइंट) - हॉटेल ट्रायडंट - नेताजी सुभाष मार्ग मरिन ड्राइव्ह - कोस्टल रोड - पारसी जनरल रुग्णालय जंक्शन- वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली)- महालक्ष्मी रेसकोर्स- महालक्ष्मी रेल्वे स्थानक - सात रस्ता भायखळा स्थानक (प.).