Join us  

विमाने हाउसफुल्ल! जूनमध्ये २,३६४ जणांना प्रवास नाकारला; प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 10:56 AM

विमान प्रवाशांच्या वाढत्या विक्रमी संख्येच्या पार्श्वभूमीवर आता विमाने हाऊसफुल्ल होत आहेत.

मुंबई :विमान प्रवाशांच्या वाढत्या विक्रमी संख्येच्या पार्श्वभूमीवर आता विमाने हाऊसफुल्ल होत आहेत. यामुळे अनेक प्रवाशांना विमान कंपन्या प्रवास नाकारत असल्याचे दिसून आले आहे. जून महिन्यात देशात एकूण २,३६४ प्रवाशांना विमान प्रवास नाकारल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून पुढे आली आहे. त्या अगोदर मे महिन्यात आतापर्यंत विक्रमी अशा २,७१९ प्रवाशांना विमानप्रवास नाकारण्यात आला होता.

कुणी किती प्रवास नाकारला?

१) १९२० प्रवाशांना एअर इंडियाने प्रवास नाकारल्याची माहिती आहे. हा आकडा सर्वाधिक आहे.

२) १८८ प्रवाशांना विस्तारा कंपनीने प्रवास नाकारला. 

३) स्पाइसजेटने १५९, इंडिगोने ८४, अकासा एअरने १०, तर अलायन्स एअरने तीन प्रवाशांना प्रवास नाकारल्याची माहिती आहे.

प्रवास का नाकारला?

१)  बहुतांश विमान कंपन्या विमान प्रवास रद्द होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन क्षमतेपेक्षा काही आसनांची जास्त विक्री करतात. 

२)  बहुतेक वेळा विमान कंपन्यांचा अंदाज खरा ठरतो आणि प्रवासी रद्द झाल्यानंतर अन्य प्रवाशाला जारी करण्यात आलेल्या तिकिटाद्वारे प्रवास करण्याची मुभा देण्यात येते. 

३)  मात्र, मे तसेच जून महिन्यांत विमानप्रवास रद्द होण्याचे प्रमाण घटल्यामुळे संबंधित प्रवाशांनी चेक-इन करूनही विमान कंपन्यांनी त्यांना प्रवास करण्यापासून रोखले. 

 प्रवास नाकारल्यानंतर काय होते? 

१) ज्यावेळी विमान प्रवाशांना प्रवास नाकारला जातो, त्यावेळी संबंधित प्रवाशाला अन्य विमानाद्वारे प्रवास करण्याची सोय करून द्यावी लागते किंवा तिकिटाचे संपूर्ण पैसे विमान कंपन्यांना परत करावे लागतात. जून महिन्यात विविध विमान कंपन्यांनी विमानप्रवास रद्द केलेल्या प्रवाशांना एकूण अडीच कोटी रुपयांची भरपाई दिली आहे.

सहा महिन्यांत विक्रमी प्रवासीसंख्या-

१) जानेवारी ते जून अशा चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत देशात एकूण सात कोटी ९३ लाख लोकांनी विमानप्रवास केल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रसिद्ध केली आहे. 

२) याचसोबत मुंबई विमानतळ प्रशासनानेही चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरून एकूण एक कोटी ३४ लाख लोकांनी प्रवास केल्याचे दिसून आले. १८ मे या एका दिवसात मुंबई विमानतळाने एक लाख ६३ हजार १६६ इतकी विक्रमी प्रवासीसंख्या हाताळली.

टॅग्स :मुंबईविमान