Join us

मुंबई विमानतळावर चक्क ३३३ रुपयांना विकली जाते पाणीपुरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 14:37 IST

पाणी पुरी म्हटलं तर लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा विषय आहे.  

Mumbai : पाणीपुरी म्हटलं तर लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. रस्त्यावर, चौकात, नाक्यावर असणाऱ्या गाड्यांवर जवळपास २० ते २५ रुपयांमध्ये मिळणारी पाणीपुरी तुम्ही खाल्लीच असेल. पण चक्क पाणीपुरीची एक प्लेट जर ३३३ रुपयांना विकली जात असेल तर? मुंबईच्याविमानतळावर एका फूडस्टॉलवर पाणीपुरी चक्क ३३३ रुपयांना विकली जात असल्याचा फोटो सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरतोय. 

आता तुम्ही म्हणाला या ३३३ रुपयांच्या पाणीपुरीमध्ये वेगळं असं आहे तरी काय? तर तेही काही कळालेलं नाही. एका शुगर कॉस्मेटिक कंपनीच्या सीईओने याचा फोटो एक्सवर शेअर केला आहे. कौशिक मुखर्जी असं या उद्योजकाचं नाव आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये पाणीपुरी, दहीपुरी तसेच शेवपुरी हे चाट दिसत आहेत. प्रत्येक प्लेटमध्ये ८ पुऱ्या ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. पण या चाटची किंमत पाहून सर्व चक्रावलेत. या एका चाट प्लेटची किंमत तब्बल ३३३ रुपये  इतकी आहे.

''मुंबईच्याविमानतळावर जागेचं भाडं खूप जास्त आहे हे ठावूक होतं. पण हे दृश्य पाहून ते इतकं महाग असेल याची कल्पना मी केली नव्हती,'' असं त्यांनी उपरोधिकपणे म्हटलं आहे. 

हायजिनच्या नावावर भरमसाठ किंमतीचे पदार्थ विमानतळावर विकले जातात. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टवर ''पाणीपुरी परदेशातून आयात केली जाते आहे का?  असा प्रश्न एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये उपस्थित केलाय. तर एकानं आमीर खानच्या 'थ्री इडियट्स'मधला डायलॉगची आठवण करुन दिलीय. 

याआधीही मुंबई विमानतळावर ६२० रुपये किंमतीचा डोसा आणि ताक विकलं जातं असल्याचाही फोटो व्हायरल झाला होता. त्यात आता या ३३३ रुपयांची पाणीपुरीची भर पडली आहे.

टॅग्स :मुंबईविमानतळसोशल व्हायरलसोशल मीडिया