मनोहर कुंभेजकर, मुंबई : गोरेगाव पूर्वेतील पुरातन आरे तलावात सुमारे १०० वर्षांपासून घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र, हा तलाव ईको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्यामुळे गेल्या वर्षापासून या तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांची गैरसोय झाली. त्याचा विचार करून यंदा हा तलाव ‘ईको सेन्सिटिव्ह’मधून वगळावा, व मूर्तींच्या विसर्जनाला परवानगी द्यावी, अशी मागणी नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
जोगेश्वरी, गोरेगाव व मालाड परिसरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सुमारे एक हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे आरे तलावात विसर्जन होते. दरवर्षी येथे विसर्जनासाठी येणाऱ्या मूर्तींची संख्या वाढतच आहे. २०२२ पर्यंत या तलावात सुरळीतपणे विसर्जन झाले. मात्र, केंद्र सरकारच्या पर्यावरण जलवायू व हवामानबदल विभागाच्या ५ डिसेंबर २०१६ च्या अधिसूचनेनुसार आरे दुग्ध वसाहतीमधील संपूर्ण परिसर पर्यावरण व संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आल्याने आरे तलावात गणेश विसर्जन करता येणार नाही, असे पत्र आरे दुग्ध वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी ११ ऑगस्ट २०२३ रोजी पालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभागाचे तत्कालीन सहायक आयुक्त राजेश अक्रे यांना पाठवले होते. परिणामी या तलावात मूर्तींच्या विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे.
गणेशभक्तांची गैरसोय-
आरे तलावात मूर्तींच्या विसर्जनाला बंदी घातल्याने जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड या परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गेल्यावर्षी मोठा त्रास सहन करावा लागला. अखेरच्या क्षणी आरे येथील पार्किंगच्या जागेत ‘पी दक्षिण’ विभागाने कृत्रिम तलावाची व्यवस्था केली होती. मात्र, चार फुटांवरील मोठ्या सार्वजनिक गणेशमूर्ती अन्यत्र विसर्जनासाठी न्याव्या लागल्या होत्या.
‘मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर करा’-
१) आरे येथे मेट्रो कारशेडसाठी सरकारने जसा ईको सेन्सिटिव्ह झोन उठवला होता. त्याप्रमाणे गणेशभक्तांच्या भावनांचा आदर करून तलाव परिसर हा ईको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळावा.
२) विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळात तसा प्रस्ताव पारित करून आरे तलावात विसर्जनासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आरे येथील सामाजिक कार्यकर्ते व नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.