‘त्या’ गणेश मंडळांना सलग पाच वर्षे परवानगी; केवळ स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 10:15 AM2024-08-02T10:15:31+5:302024-08-02T10:17:28+5:30
गेली दहा वर्षे सरकारी नियमांचे आणि कायद्याचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षांकरिता परवानगी देण्यात येणार आहे.
मुंबई : गेली दहा वर्षे सरकारी नियमांचे आणि कायद्याचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षांकरिता परवानगी देण्यात येणार आहे. याकरिता सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना, त्यांनी गेल्या दहा वर्षांत सर्व नियम, कायदे यांचे पालन केले आहे आणि त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही, असे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे.
एक खिडकी योजनेनुसार ६ ऑगस्टपासून संगणकीय प्रणालीद्वारे सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्यात येणार आहे. एक खिडकी योजनेद्वारे प्राप्त अर्जांची विभागीय कार्यालयाकडून छाननी करण्यात येईल. त्यानंतर स्थानिक पोलिस स्टेशन, वाहतूक पोलिस विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करून नियमानुसार मंडपासाठी परवानगी देण्यात येणार आहे. यंदा नव्यानेच सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी देण्यात येणारी मंडप उभारण्याची परवानगीही या वर्षासाठीच मर्यादित असेल.
परवानगीचे नूतनीकरण करावे लागणार-
१) मंडळांसाठी सलग पाच वर्षांकरिता परवानगी देण्यात येणार आहे. तसेच या मंडळांना दरवर्षी या परवानगीचे नूतनीकरण करावे लागणार आहे. या नूतनीकरणात वाहतूक आणि स्थानिक पोलिसांची परवानगी मिळवणे आवश्यक असेल.
२) याशिवाय, खासगी जागेवर परवानगी प्राप्त झालेल्या मंडळांना उत्सवापूर्वी विशिष्ट कालावधीत जागामालक अथवा सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिस यांची परवानगी मिळवणे आवश्यक असेल. सार्वजनिक जागेवरील गणेशोत्सव मंडपाकरिता १०० रुपये शुल्क आकारले जाईल.
ऑनलाईन अर्ज-
गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यासाठी महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा देण्यात येत आहे. आतापर्यंत १२३७ मूर्तिकारांकडून मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज आले आहेत.
पालिकेचे आवाहन-
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन उपआयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.
शाडू माती मोफत-
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मोफत शाडू मातीसाठी एकूण २१७ मूर्तिकारांनी मागणी केली आहे. त्यांना आतापर्यंत सुमारे ५०० टन मोफत शाडू माती देण्यात आली आहे.