लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पावसाचा जोर ओसरला असला तरी पावसाळी आजारांची संख्या काही कमी झालेली नाही. उलट, त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. हे दोन्ही आजार डासांमुळे होतात. आपल्या आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्तिस्थळे असतील तर नागरिकांनी ती तातडीने नष्ट करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.
सध्या मुंबई महानगरात ‘भाग मच्छर भाग’ जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावर डासांची उत्पत्ती ही डेंग्यू व हिवतापसारख्या आजारांचा प्रादुर्भाव आणि साथवाढीचे मूळ कारण आहे. ते नष्ट केले तर या आजारांवरही नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
काही रुग्णांमध्ये थंडी, ताप, खोकला आणि सर्दी अशी सर्वसामान्य लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, दोन ते तीन दिवसांनी रक्ताची चाचणी केल्यानंतर मात्र कुठल्याही आजाराचे निदान दिसून येत नाही. डॉक्टर व्हायरलची साथ असल्याचे सांगून लक्षणानुसार उपचार करत आहेत. विशेष म्हणजे, तीन-चार दिवसात हा आजार बरा होत असला, तरी अंगदुखीमुळे मात्र बाधित रुग्ण पुरते हैराण होत असल्याचे पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रतिबंधक उपाययोजना-
१) नागरिकांनी आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व इमारतींच्या परिसरात कुठेही पाणी साचलेले असणार नाही, याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालते व डासांची उत्पत्तिस्थळे तयार होतात.
२) ही बाब लक्षात घेता साचलेले पाणी आढळून आल्यास असता त्याचा तत्काळ निचरा करावा. टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या बाटल्या व झाकण, झाडांच्या कुंड्या, फ्रीजचा डिफ्रॉस्ट ट्रे यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. फेंगशुई, मनी प्लांट यांसारख्या शोभेच्या रोपट्यांचे पाणी नियमितपणे बदलावे. दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करावा.