अंधेरीतील भूमिगत मार्केटसाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा; आमदारांचे आयुक्तांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 10:14 AM2024-09-19T10:14:30+5:302024-09-19T10:17:02+5:30

अंधेरी स्थानकासारख्या वर्दळीच्या भागातून फेरीवाल्यांना स्थलांतरित करून स्थानक परिसर हा पादचाऱ्यांसाठी अनुकूल बनविण्याची योजना आहे.

in mumbai an alternative location should be explored for the underground market in andheri mlas letter to commissioner  | अंधेरीतील भूमिगत मार्केटसाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा; आमदारांचे आयुक्तांना पत्र 

अंधेरीतील भूमिगत मार्केटसाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा; आमदारांचे आयुक्तांना पत्र 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतील अरुंद रस्ते, दुतर्फा पार्किंग, जागेचा अभाव, फेरीवाल्यांना हक्काची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी नवी दिल्लीच्या धर्तीवर भूमिगत मार्केट संकल्पना राबविण्याचे आदेश शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालिकेला दिले आहेत. त्यासाठी अंधेरीतील आंब्रे गार्डनची निवड केली आहे.  

भूमिगत मार्केटसाठी पालिकेकडून चाचपणी सुरू आहे. मात्र, आंब्रे गार्डनच्या खाली होणाऱ्या या मार्केटबाबत पालिकेने पुनर्विचार करावा, अशी मागणी तेथील स्थानिक रहिवासी संघटनांनी केली आहे. त्याच्याऐवजी पर्यायी जागेवर याचा विचार करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. पालिकेने स्थानिकांशी संवाद साधून याबाबतचा निर्णय घ्यावा, असे पत्र आमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिले आहे. 

अंधेरी स्थानकासारख्या वर्दळीच्या भागातून फेरीवाल्यांना स्थलांतरित करून स्थानक परिसर हा पादचाऱ्यांसाठी अनुकूल बनविण्याची योजना आहे. मात्र, प्रस्तावित जागेत आंब्रे गार्डनच्या खाली अंधेरी स्थानकाप्रमाणे फेरीवाल्यांना व्यवसाय मिळणार नाही, असे मत आमदार अमित साटम यांनी पत्रात व्यक्त केले आहे. त्यापेक्षा अंधेरी मार्केट हे एस.व्ही. रोड आणि अंधेरी स्थानकापासून जवळ आहे. आंब्रे गार्डनच्या तुलनेत येथे अधिक वर्दळ आहे. त्यामुळे मार्केटला येणारे ग्राहक आणि स्टेशन, एस.व्ही. रोडच्या भागातून जाणाऱ्या नागरिकांनाही ते सोयीचे ठरेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, नवी दिल्लीच्या धर्तीवर या भूमिगत मार्केट संकल्पनेला किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल,  याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. 

फेरीवाल्यांनाही व्यवसाय हवा-
 
पादचाऱ्यांसोबत फेरीवाल्यांचाही ही या प्रकियेत विचार व्हायला हवा. त्यांच्या स्थलांतरामुळे व्यवसायावर परिणाम झाला तर त्यांची उपजीविका धोक्यात येऊ शकते. त्यामुळे त्यांची बाजू प्रशासनाने लक्षात घ्यावी, असे म्हणणे साटम यांनी पत्रात मांडले. 

रहिवासी संघटनांसोबत लवकरच बैठक-

आमदार साटम स्थानिक रहिवासी संघटनांसोबत बैठक घेऊन मते जाणून घेणार आहेत. आंब्रे गार्डनखालील भूमिगत मार्केटला  रहिवाशांचा विरोध का आहे? यावर पर्याय काय? अशा  मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.

Web Title: in mumbai an alternative location should be explored for the underground market in andheri mlas letter to commissioner 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.