Join us

लग्नाच्या आमिषाने केली फसवणूक, ५५ लाख उकळले; विलेपार्ले पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 11:52 AM

अंधेरीतील ४१ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष आणि बिझनेस पार्टनर बनण्याची ऑफर देत तिची ५५ लाख ४२ हजार ९२४ रुपयांची फसवणूक करण्यात आली.

मुंबई : एका मॅट्रिमोनियल साइटमार्फत अंधेरीतील ४१ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष आणि बिझनेस पार्टनर बनण्याची ऑफर देत तिची ५५ लाख ४२ हजार ९२४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तिने विलेपार्ले पोलिसात समर्थ भाईंदरकर याच्याविरोधात तक्रार दिली असून, गुन्हा दाखल झाला आहे.

लग्नासाठी महिलेने जीवनसाथी या मॅट्रिमोनियल साइटवर स्वतःची वैयक्तिक माहिती भरली. त्यातून ८ ऑक्टोबर २०२३ रोजी तिची ओळख समर्थ सोबत झाली. त्याने तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता. दोन दिवसांनी गोरेगावच्या विरवाणी परिसरात तक्रारदार महिला आणि समर्थ भेटले. तिथून ते मीरा रोडच्या इस्कॉन मंदिरात गेले. यानंतर चार दिवसांनी दोघांनी एकमेकांशी लग्न करण्यास होकार दिला.

समर्थने बारावीपर्यंत आपले शिक्षण झाले असून, इंटेरियर कोर्स केल्याचे सांगितले. तसेच व्हिसा बनवून देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. त्याने तिला आपल्या कुटुंबीयांचीदेखील माहिती देत भाऊ पराग अविवाहित असून, परदेशात व्यवसायानिमित्त राहत असल्याचे सांगितले. आता दुबईमधून मोबाइल मागवत मुंबईत दुकान उघडून व्यवसाय करण्याचा विचार करत असल्याचे समर्थने तक्रारदाराला सांगितले. त्यासाठी मला एक पार्टनर हवा आहे. तू माझी बिझनेस पार्टनर होशील का, असे विचारले.

तक्रारदाराने होकार दिल्यावर तिचे आधार कार्ड, लायसन्स आणि पॅन कार्डची झेरॉक्स करारनाम्यासाठी घेतली. मात्र, तो करारनामा त्यांना दिलाच नाही.

'लग्न करणार नाही'-

व्यवसायासाठी ऑर्डर केलेले मोबाइल कस्टम ड्युटी शिल्लक असल्याने विमानतळावर अडकून पडल्याचे समर्थने सांगितले. ती रक्कम भरण्यासाठी त्याने महिलेकडे पैसे मागितले, तेव्हा स्वतःचे १८.८० लाख रुपये किमतीचे दागिने महिलेने त्याला दिले. समर्थ आणखी पैशाची मागणी करत होता. तेव्हा स्वतःची गुंतवणूक, एफडी मोडून, नातेवाइकांकडून उसने घेऊन ते पैसे तक्रारदाराने त्याला दिले. ११ जानेवारी २०२४ रोजी समर्थने मी तुझ्याशी लग्न करणार नाही, असे व्हॉट्सअॅप मेसेज करत सांगितले.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसधोकेबाजी