गोखले पुलाचा मुहूर्त हुकणार? १ जुलै रोजी वाहतुकीस खुला होण्याबाबत रहिवासी साशंक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 09:40 AM2024-06-26T09:40:24+5:302024-06-26T09:43:29+5:30
सद्यःस्थितीत बर्फीवाला पूल अजूनही हायड्रॉलिक जॅकवर उभा असून, त्याची काँक्रिट क्युरिंगची कामे महापालिकेकडून पूर्ण करण्यात येत आहेत.
मुंबई : अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले आणि सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल यांच्या जोडणीनंतर आवश्यक ती कामे करून १ जुलै रोजी हा पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन आहे. मात्र, सद्यःस्थितीत बर्फीवाला पूल अजूनही हायड्रॉलिक जॅकवर उभा असून, त्याची काँक्रिट क्युरिंगची कामे महापालिकेकडून पूर्ण करण्यात येत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवसांत ही कामे पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला कसा होणार, असा प्रश्न स्थानिक रहिवासी विचारत आहेत.
दरम्यान, क्युरिंगची कामे झाल्यानंतर लोड टेस्ट आणि अन्य चाचण्यांनंतरच गोखले पूल वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे मुंबई पालिकेच्या पूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
'जॅक', 'एमएस स्टुल पॅकिंग'चा वापर-
सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल एका बाजूला एक हजार ३९७ मिलिमीटर व दुसऱ्या बाजूला ६५० मिलिमीटर वरच्या दिशेने उचलण्यासाठी 'हायड्रॉलिक जॅक' आणि 'एमएस स्टुल पॅकिंग'चा वापर करण्यात आला.
त्याचबरोबर या उड्डाणपुलाखाली पेडेस्टल (आधार देणारे खांब) वापरण्यात आले आहेत.दोन पेडस्टलचा आधार देत जोडणी करावयाचा भाग हा एक हजार ३९७ मिलिमीटरने या उड्डाणपुलाच्या गर्डरवर उचलण्यात आला आहे. तसेच सहा नवीन बेअरिंगही त्या साच्यात बसविल्या आहेत, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
'क्युरिंग'साठी हवेत १४ दिवस-
पेडस्टलला दिलेले 'बोल्ट' हे बर्फीवाला पुलाच्या पिलरशी जुळणे हे मोठे आव्हान होते. अवघ्या दोन मिमी जागेच्या अंतरात अतिशय अचूकपणे हे दोन्ही पेडेस्टल जुळवण्याचे आव्हान पूल विभागाचे अभियंता आणि सल्लागारांच्या तांत्रिक चमूने पेलले. मात्र, यानंतर क्युरिंगसाठी १४ दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याने पूल वाहतुकीसाठी १ जुलैला खुला होण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
'लोड टेस्ट', सांध्याचे कामही लवकरच-
गोखले पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या पुलावर २४ तासांच्या कालावधीत 'लोड टेस्ट' करण्यात येईल. त्यासोबत पुलाच्या जोडणी सांध्याचे कामही लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर पुलावर वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते कार्य यापूर्वी निर्धारित केलेल्या टप्प्यांनुसार करण्यात येईल. या सगळ्या चाचण्या झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पूल विभागाकडून देण्यात आली.