Join us  

'जिओ पॉलिमर'मुळे गुंदवली रस्ता गुळगुळीत, पालिकेकडून डागडुजी; वाहतूक सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 11:26 AM

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो मार्ग उभारताना गुंदवली उन्नत मेट्रो स्थानकाखालील रस्ता मोठ्या प्रमाणावर खचून स्थानकाची हानी होण्याचा प्रकार थोडक्यात टळला होता.

मुंबई : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो मार्ग उभारताना गुंदवली उन्नत मेट्रो स्थानकाखालील रस्ता मोठ्या प्रमाणावर खचून स्थानकाची हानी होण्याचा प्रकार थोडक्यात टळला होता. याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर हा रस्ता पूर्ववत करण्यासाठी मुंबई महापालिकेने स्थानकाखालील काँक्रीट रस्त्याचे 'जिओ पॉलिमर' तंत्रज्ञान वापरून काँक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली असून, स्थानिक रहिवाशांनाही दिलासा मिळाला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो रेल्वे प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या मेट्रोच्या कामादरम्यान काँक्रीटच्या रस्त्याला बाधा निर्माण झाली होती. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक रहिवासी व प्रवासी यांनी याप्रकरणी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी त्याची दखल गंभीर दखल घेतली होती.

गुंदवली मेट्रो स्थानक परिसरातील काँक्रीट रस्ता वाहतूकयोग्य स्थितीत ठेवावा, पावसाळ्यात नागरिक तसेच वाहतुकीला त्रास होऊ नये, रस्ते दुरुस्तीसाठी पालिकेच्या रस्ते विभागाने नवीन व प्रगत अभियांत्रिकी पद्धतींचा अवलंब करावा, असे निर्देश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर दिले होते. त्यानुसार, रस्ते विभागाने पश्चिम द्रुतगती मार्गावर गुंदवली उन्नत मेट्रो स्थानकाखालील काँक्रीट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 'जिओ पॉलिमर' तंत्रज्ञानाचा वापर केला.

अवघ्या दोन तासांत रस्ता खुला करणे शक्य-

जिओ पॉलिमर काँक्रीट हे नावीन्यपूर्ण आणि पर्यावरणास फायदेशीर बांधकाम साहित्य आहे. हे काँक्रीट लवकर घट्ट बसते. त्यामुळे खडबडीत रस्त्यांची डागडुजी या पद्धतीने करता येते. वर्दळीचे रस्ते, प्रमुख चौंक आदी ठिकाणी पारंपरिक पद्धतीने काँक्रिटीकरण करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या परवानगीने ३० दिवसांचा 'ब्लॉक' घ्यावा लागतो. त्यामुळे प्रवासी, नागरिकांची मोठी गैरसोय होते. 

पालिकेने त्यावर पर्याय म्हणून आगामी काळात रस्त्यावरील भेगा तसेच देखभालीसाठी जिओ पॉलिमर काँक्रीटसारख्या पर्यायांचा वापर करावा, अशी शिफारस पवईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी, मुंबई) तज्ज्ञांनी केली. 'जिओ पॉलिमर'चा वापर काँक्रीट रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी प्रामुख्याने करण्यात येतो. काँक्रीटचा रस्ता खराब झाला असल्यास संपूर्ण पृष्ठभाग न काढता केवळ खड्यांमध्ये है काँक्रीट भरले जाते. ते मूळ काँक्रीटसमवेत एकजीव होते. या पद्धतीने खड्डे भरल्यानंतर अवघ्या दोन तासांत रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येऊ शकतो.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाअंधेरीरस्ते सुरक्षादहिसर