कोस्टल रोड कंत्राटदाराला पुन्हा मुदतवाढ; संपूर्ण मार्ग खुला होण्यासाठी वेळ लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 11:21 AM2024-08-02T11:21:27+5:302024-08-02T11:23:14+5:30
कोस्टल रोडचे आतापर्यंत ९१ टक्के काम झाले असून, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
मुंबई : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याचे (कोस्टल रोड) आतापर्यंत ९१ टक्के काम झाले असून, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. मात्र, प्रकल्पाच्या चौथ्या भागाचे काम मे २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना ते कंत्राटदाराकडून झालेले नाही. याआधी या कामासाठी तीनदा मुदतवाढ दिली असताना पुन्हा आणखी १८१ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कंत्राटदाराने केली आहे. दरम्यान, संपूर्ण कोस्टल रोड वाहतुकीस खुला होण्यासाठी नवीन वर्ष उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे.
कोस्टल रोड प्रकल्प प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत असून, तो तीन भागांत विभागला गेला आहे. मात्र, यातील चौथा भाग म्हणजे प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शिनी पार्कपर्यंतच्या कामासाठी कंत्राटदाराने पालिकेकडून १८१ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे संपूर्ण मार्ग खुला होण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार आहे.
७.२५ कोटींचा दंड-
१) याआधी चौथ्या भागाला मे २०२३, नोव्हेंबर २०२३, एप्रिल २०२४ अशी तीनदा मुदतवाढ देण्यात आली होती. या भागाचे काम मे. लार्सन ॲण्ड टुब्रो करीत असून, या भागाच्या मूळ खर्चात ६३.८३ कोटींची वाढ झाली आहे.
२) या टप्प्याचा मूळ खर्च २ हजार ७९८ कोटी अपेक्षित होता. मात्र, २० जूनपर्यंतच्या मुदतीत तो पूर्ण न झाल्याने पालिकेने कंत्राटदाराला ७.२५ कोटींचा दंड आकारत २६ नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली होती. '
कोस्टल रोडचे काम २०२५ पर्यंत १०० टक्के पूर्ण होणार नाही, हे स्पष्ट आहे. दरम्यान, राज्य सरकारने निवडणुकांचा काळ लक्षात घेता घाईगडबडीत उद्घाटनाचा घाट घालू नये. काम पूर्ण होऊन मगच योग्य निर्णय घ्यावा. - अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते
या मार्गिका खुल्या-
कोस्टल रोडची बिंदुमाधव ठाकरे चौक (वरळी) ते मरिन ड्राइव्ह ही दक्षिण वाहिनी मार्गिका ११ मार्च २०२४ पासून, तर मरिन ड्राइव्ह ते हाजी अली मार्गे लोट्स जंक्शन ही उत्तर वाहिनी मार्गिका १० जून २०२४ रोजी खुली केली आहे. तसेच हाजी अली ते खान अब्दुल गफार खानपर्यंतची उत्तर दिशेने जाणारी ३.५ किमीची मार्गिका ११ जुलै २०२४ पासून वाहतुकीसाठी खुली झाली आहे.
वरळी-वांद्रे सी-लिंकपर्यंत विस्ताराला लेटमार्क -
मरिन ड्राइव्ह ते वरळी सी-लिंकपर्यंत व त्यापुढे वाहनचालकांचा प्रवास सोपा व्हावा, यासाठी कोस्टल रोडच्या दक्षिण बाजूकडील या जोडणीमुळे कोस्टल आणि सी-लिंक एकमेकांना पूर्णपणे जोडले गेले. मात्र, याची दक्षिण वाहिनी १५ ऑगस्टपर्यंत खुली करण्याचे लक्ष्य गाठणे कठीण आहे. पावसामुळे या मार्गिकेच्या कामात अडथळे येत असल्याने त्यामुळे कामांना विलंब होत आहे.