उत्तरपत्रिका पुन्हा व्हायरल, तिसरी ते नववी पायाभूत चाचणी; मूळ उद्देशालाच हरताळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 10:50 AM2024-07-13T10:50:09+5:302024-07-13T10:53:06+5:30

राज्यातील शाळांमध्ये तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील वर्षातील वर्गाचा अभ्यास कितपत कळला हे तपासण्यासाठी पायाभूत चाचणीचे आयोजन करण्यात येते.

in mumbai answer sheet viral again std 3rd to 9th foundation test in youtube | उत्तरपत्रिका पुन्हा व्हायरल, तिसरी ते नववी पायाभूत चाचणी; मूळ उद्देशालाच हरताळ 

उत्तरपत्रिका पुन्हा व्हायरल, तिसरी ते नववी पायाभूत चाचणी; मूळ उद्देशालाच हरताळ 

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील वर्षातील वर्गाचा अभ्यास कितपत कळला हे तपासण्यासाठी पायाभूत चाचणीचे आयोजन करण्यात येते. यंदाही १० ते १२ जुलैदरम्यान एसीसीईआरटीकडून या चाचण्या घेण्याच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या होत्या. मात्र, या परीक्षेच्या उत्तरपत्रिका काही तास आधीच यूट्यूबवर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून या चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व्हायरल होण्यापासून आता थेट उत्तर पत्रिका व्हायरल होण्याचे प्रकार घडत आहेत. 

राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी पायाभूत चाचण्या घेण्यात येतात. तीन चाचण्यांच्या या साखळीतील पहिली चाचणी बुधवारपासून राज्यात सुरू झाली. दरवर्षी या चाचण्यांत नवीन गोंधळ समोर येत असतात. गेल्या तीन वर्षांप्रमाणेच यंदाही पायाभूत चाचण्यांच्या उत्तरपत्रिका व्हायरल झाल्या आहेत. 

शिक्षण विभागाकडून कार्यवाहीनंतरही... 

१) याआधी मार्च महिन्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार घडला असून, पालिका शिक्षण विभागाकडून कार्यवाहीही करण्यात आली. 

२) त्यानंतर आता पुन्हा उत्तरपत्रिका १० वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सॲपवर व्हायरल होण्याचा प्रकार समोर आला आहे.
 
शिक्षक, पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर लिंक-

१) सातवीची इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिकेची युट्यूब लिंक शिक्षक आणि पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर व्हायरल होत आहेत. 

२) या चाचण्यांच्या आधारे अप्रगत मुलांचे पूरक वर्ग घेण्याबाबत नियोजन केले जाणार आहे. 

३)  पण, पायाभूत चाचणीतच इतके कच्चे दुवे राहिल्यास पुढील पूरक वर्गाचे नियोजन तरी कसे करणार? त्यामुळे, सर्व मुलांना प्रगत करण्याच्या हेतूलाच हरताळ फासला जाणार नाही का, असा सवाल शिक्षक यानिमित्ताने उपस्थित करत आहेत. 

४) यासंदर्भात एससीईआरटीच्या संचालिका कमला आवटे यांच्याशी संपर्क केला असता, उत्तरपत्रिका कोणी व्हायरल केली, याचा शोध घेत आहोत, असे एससीईआरटीच्या संचालिका आवटे यांनी सांगितले.

Web Title: in mumbai answer sheet viral again std 3rd to 9th foundation test in youtube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.