लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अकरावी प्रवेशासाठी सहाव्या विशेष फेरीची घोषणा करण्यात आली असून, येत्या बुधवारपासून विद्यार्थ्यांना यासाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. विद्यार्थ्यांना २१ तारखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून, त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी सहाव्या विशेष फेरीसह गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.
सहावी विशेष फेरी ही शेवटची विशेष फेरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थी किंवा कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाला प्रवेश रद्द करता येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेऱ्या आणि पाच विशेष फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये दोन लाख ६९ हजार ९७१ विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशाची निश्चिती केली आहे, तर २९ हजारांहून अधिक विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशाची निश्चिती केली आहे. तरीही अकरावी प्रवेशाच्या एक लाखाहून अधिक जागा रिक्त आहेत. या सहाव्या विशेष फेरीमध्ये एटीकेटी सवलत मिळालेले विद्यार्थीही अर्ज करू शकतील.
डेली मेरिट राउंड होणार-
या फेरीनंतर डेली मेरिट राउंड सुरू होणार असून, त्याचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध होईल. यापूर्वी प्रथम प्राधान्य फेरीचे आयोजन करण्यात येत होते. त्यात मोठ्या प्रमाणात अकरावी प्रवेशात गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे प्रथम प्राधान्य फेरी गेल्या वर्षी बंद केली होती. मात्र, आता पुन्हा त्याच धर्तीवर पाचव्या विशेष फेरीनंतर डेली मेरिट राउंड (डीएमआर) फेरी होणार आहे. गुणवत्ता यादी दररोज जाहीर केली जाणार आहे.