लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिकेची तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनी पवई येथे शुक्रवारी दुपारी अचानक फुटली. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले. पालिकेच्या जल अभियंता विभागाने घटनास्थळी तत्काळ धाव घेत ही गळती थांबवली. दरम्यान, युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू असली तरी, त्यासाठी लागणारा कालावधी पाहता एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर शनिवारी परिणाम होणार आहे.
पवई येथे आरे वसाहतीजवळील गौतमनगर परिसरात १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनीला शुक्रवारी मोठी गळती लागल्याचे आढळून आले. या जलवाहिनीतून पाण्याचे फवारे उडत होते. त्याची माहिती मिळताच, सहायक अभियंता नगर बाह्य (प्रमुख जलवाहिन्या) विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी तत्काळ तेथे जाऊन जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बंद करून गळती थांबली.
पालिकेने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असले तरी ते पुढील सुमारे २४ तास सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐन पावसाळ्यात ही घटना घडल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
या भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम-
के पूर्व विभाग : प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी १/२, हनुमाननगर, मोटानगर, शिवाजीनगर, शहीद भगतसिंग वसाहत (अंशतः), मुकुंद रुग्णालय, टेक्निकल परिसर, इंदिरानगर, मापकंदनगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग, चिमटपाडा, सानबाग, मरोळ, एमआयडीसी परिसर, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बागरखा मार्ग, कांतीनगर, सहार रोड, कबीरनगर, बामणवाडा, पारशीपाडा, विमानतळ वसाहत, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, दौलतवाडी, पी. एन. टी. वसाहत, मिलिटरी मार्ग, विजय नगर, मरोळ-मरोशी मार्ग. मुलगाव डोंगरी, एमआयडीसी मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, वाणीनगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज. ओमनगर, कांती नगर, राजस्थान गृहनिर्माण संस्था, साईनगर, सहार गाव, सुतार पाखाडी, कार्गो संकुल
एच पूर्व विभाग- वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसर, बेहरामपाडा
जी उत्तर विभाग- धारावी
एस विभाग- गौतम नगर, जयभीम नगर, फिल्टरपाडा, बेस्ट सर्कल, गावदेवी, इस्लामिया चाळ, पठाणवाडी, महात्मा फुलेनगर, कैलासनगर, पासपोली गाव, निटी परिसर, अमृत हॉटेल लगतचा परिसर.