Join us

मेट्रो स्थानकांचा परिसर होणार हिरवागार; एमएमआरसीकडून वृक्षारोपणासाठी ३ कंत्राटे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 11:43 AM

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) मेट्रो ३ मार्गिकेच्या स्थानकांवर आणि स्थानकांच्या परिसरात २६०० झाडे लावली जाणार आहेत.

मुंबई : मुंबईमेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) मेट्रो ३ मार्गिकेच्या स्थानकांवर आणि स्थानकांच्या परिसरात २६०० झाडे लावली जाणार आहेत. या वृक्षारोपणासाठी एमएमआरसीने तीन कंत्राटे दिली आहेत. यातील १३ मेट्रो स्थानकांजवळ ५०० हून अधिक झाडे लावली आहेत, असे एमएमआरसीकडून सांगण्यात आले आहे. 

एमएमआरसीने मेट्रो मार्गिकेच्या उभारणीसाठी अडथळा ठरणारी झाडे तोडली होती. तसेच काही झाडांचे स्थलांतरण करण्यात आले होते. मात्र त्या प्रमाणात झाडे लावली नाहीत. तसेच जी झाडे लावली त्यातील अनेक झाडे जगली नाहीत, असा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयानेही एमएमआरसीला फटकारले होते. या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानकांच्या परिसरात झाडे लावण्याची हमी एमएमआरसीने न्यायालयात दिली होती. त्यानुसार मेट्रो मार्गिका ३ च्या मेट्रो स्थानकांवर आणि शेजारच्या भागात २६०० झाडे लावली जाणार आहेत.

आतापर्यंत ५०० हून अधिक झाडे लावली-

१)  निवडलेले कंत्राटदार रोपवाटिकेत रुजलेल्या झाडांचा पुरवठा, लागवड आणि तीन वर्षांसाठी देखभाल करतील. स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या झाडांची मूळ जागी लागवड केली जाईल. 

२) यातील सीप्झ, एमआयडीसी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक, सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड या १३ मेट्रो स्थानकांजवळ ५०० हून अधिक झाडे लावली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

३) बांधकाम उपक्रम पूर्ण झाल्यावर आणि अधिक जागा उपलब्ध झाल्यावर झाडांचे वृक्षारोपण केले जाईल, असेही एमएमआरसीने नमूद केले.

या झाडांची होणार लागवड-

या झाडांमध्ये फुलांची झाडे, शोभेची झाडे, सदैव हिरवीगार झाडे आदी ७ वर्ष वयाची आणि सर्वसाधारण १५ फूट उंची असलेली झाडे आहेत. मळू जागी वृक्षारोपण मोहिमेसाठी निवडलेल्या वृक्षांच्या प्रजातींमध्ये महोगणी, बकुळ, पिंपळ, सोनचाफा, निलमोहोर, तामण, कदंब, देशी-बदाम, आकाश-नीम, स्पाथोडिया, ताबेबुया, अम्ब्रेला-वृक्ष, सप्तपर्णी, पिंपळ, पांगारा, जंगली बदाम, चाफा आदींचा समावेश आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रो