कुर्ला, पवई, बोरिवलीचा परिसर आणखी घनदाट; पालिकेची वृक्षलागवड मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 11:13 AM2024-07-23T11:13:20+5:302024-07-23T11:16:10+5:30
मुंबई शहरातील पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी पालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड मोहीम हाती घेतली आहे.
मुंबई : शहरातील पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी पालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतीलकुर्ला, पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी तब्बल चार एकर क्षेत्रफळावर साडेतीन हजार वृक्षांची पारंपरिक पद्धतीने लागवड करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
मुंबईतील झाडांची निगा कशी राखावी, त्यांचे संगोपन कसे करावे, वृक्षलागवड क्षेत्रात कोणकोणते अभिनव उपक्रम राबविण्यात येतील, झाडांची पडझड कशी रोखावी अशा विषयांवर ऊहापोह करण्यासाठी महानगरपालिकेचे आधिकारी आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ बैठक पालिका मुख्यालयात सोमवारी पार पडली. यात मार्गदर्शन करताना गगराणी बोलत होते.
बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, ‘प्रोजेक्ट मुंबई’चे शिशिर जोशी, पार्ले वृक्षमित्र संघटनेचे अनिकेत करंदीकर, फ्रेंड्स ऑफ ट्रीजचे डॉ. अशोक कोठारी, उद्यानविज्ञातज्ज्ञ रॉबर्ट फर्नांडिस, अनिल राजभर, ‘हरियाली’चे आठल्ये, ‘वातावरण फाउंडेशन’चे भगवान केशभट, ‘मिशन ग्रीन मुंबई’चे सुभाजित मुखर्जी, ‘मियाम ट्रस्ट’चे नितू जोशी, ‘नेचर फॉरेवर’चे मोहम्मद दिलावर, ‘मेगा फाउंडेशन’च्या अनुषा अय्यर आदी उपस्थित होते. मुंबईत अनेक ठिकाणी पुरातन वृक्ष असून, त्यांचे संगोपन करण्यासाठी पालिका विविध उपक्रम राबवीत आहेत. धोकादायक झाडाच्या फांद्यांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणीही करण्यात येते. वृक्षांची लागवड कशी वाढविता येईल, यासाठी देखील महापालिका प्रयत्नशील आहे.
उद्यानांमध्ये पक्ष्यांसाठी बारमाही पाण्याची सोय-
१) पर्यावरण अभ्यासकांनी विविध विषयांवर बैठकीत मते मांडली. पालिकेच्या उद्यानांमध्ये पक्ष्यांसाठी बारमाही पाण्याची सोय करावी, उड्डाणपुलांखाली जागेचा वापर वृक्षलागवडीसाठी करावा, नागरी वने (मियावाकी) वाढवावीत, शाळांमध्ये जनजागृती करावी, एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा वृक्षरोपणात सहभाग वाढवावा आदी विविध पर्याय सुचविले.
२) या पर्यायांचा विचार करून महानगरपालिका वृक्षलागवडीसाठी त्याचा उपयोग करण्यात येईल, असे आश्वासन उद्यान उप-आयुक्त किशोर गांधी यांनी दिले.
तीन भूखंड आरक्षित-
मुंबईत वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यासाठी कुर्ल्यातील चांदिवली, पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी मोठे भूखंड आरक्षित आहेत.
पर्यावरणतज्ज्ञांनी मत नोंदवावे-
या झाडांची निवड कशी करावी, त्यासाठी कोणती शास्त्रोक्त पद्धत वापरावी, त्यांचे आयुर्मान वाढवावे, यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत महानगरपालिका आराखडा तयार करीत आहे. यासाठी पर्यावरणतज्ज्ञांनी मत नोंदवावे, असे आवाहन श्री. गगराणी यांनी केले. महानगरपालिका कार्यक्षेत्रात आणखी २९ ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचेही पालिका आयुक्तांनी नमूद केले.