Join us  

झाडाच्या फांद्या छाटण्यावरून वाद, जोगेश्वरीत विद्यार्थिनीचा विनयभंग; पोलिसांकडून तपास सुरू

By गौरी टेंबकर | Published: July 15, 2024 4:25 PM

झाडाच्या फांद्या छाटण्यावरून झालेल्या वादात एका २० वर्षीय विद्यार्थिनीला मारहाण करत तिचा विनयभंग करण्याचा प्रकार जोगेश्वरीत घडला.

गौरी टेंबकर, मुंबई: झाडाच्या फांद्या छाटण्यावरून झालेल्या वादात एका २० वर्षीय विद्यार्थिनीला मारहाण करत तिचा विनयभंग करण्याचा प्रकार जोगेश्वरीत घडला. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

तक्रारदार विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी तिचे ४४ वर्षीय शेजारी हे त्यांच्या घरावर चढवून काही दुरुस्ती करत होते. तर त्याची २४ आणि १८ वर्षाची दोन मुले सदर ठिकाणी उभी होती. त्यावेळी घरावर असलेले आंब्याचे झाड पालिकेसोबत बोलून कापायला लावू असे मुख्य आरोपी शेजाऱ्याला सांगत होता. ही बाब पिडीतेने तिच्या आईला सांगितली. पिडीत मुलगी आपल्या वडिलांना एकेरी नावाने संबोधत असल्याचे म्हणत मुख्य आरोपीच्या मुलाने तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली.  तसेच त्याच्या वडिलांना त्यांनी झाडाच्या फांद्या कापून टाका असेही सांगितले. त्यानुसार आरोपीने त्या फांद्या कापल्या त्यामुळे तक्रारदार आणि तिची आई त्यांना तसे करू नका असे सांगत होते.

त्यावरून वाद पेटला आणि पीडितेच्या आईच्या छातीवर मुख्य आरोपीने लाथ मारली. तसेच तिघांनी मिळून आईला आणि त्यांच्या भावाला मारहाण करायला सुरुवात केली. ते पाहून तक्रारदार त्यांना सोडवायला गेली तेव्हा तिच्यावरही त्यांनी हल्ला चढवला. तर मुख्य आरोपीने तिला अश्लीलपणे स्पर्श केला असा तिचा आरोप आहे. या विरोधात त्यांनी ओशिवरा पोलिसात धाव घेतल्यावर तिघांविरोधात तक्रार दिली असून बी एन एस कायद्याचे कलम ११५(२), ३(५), ३५२ व ७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस