मुंबई : मुंबई महापालिकेने बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडका लावला आहे. पोलिकेच्या विविध विभाग कार्यालयांनी २८ ते ३० जून या तीन दिवसांमध्ये मुंबईतील विविध वर्दळीच्या परिसरांवर अधिक लक्ष्य केंद्रीत करून ५३८ फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. त्यात दादर पश्चिमेला रेल्वेस्थानक परिसरातील सर्वाधिक २०० हून अधिक फेरीवाल्यांना दणका दिला आहे. यावेळी या फेरीवाल्यांचे साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनातर्फे पदपथ आणि रस्त्यांवरील अडथळा ठरणारे फेरीवाले, पथारीवाले तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात नियमितपणे कारवाई करण्यात येते. मात्र, उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावल्यानंतर शहरातील बेकायदा फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथांवरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी करण्याच्या सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.
अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईत सहभाग-
गेल्या तीन दिवसांच्या कारवाईमध्ये एकूण ५३८ फेरीवाल्यांवर संबंधित वॉर्ड कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाई करत परिसर फेरीवालामुक्त केला. पश्चिम उपनगर परिसरातील कारवाईप्रसंगी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.
बेकायदा फेरीवाल्यांमुळे या भागातील नागरिकांना चालण्यासाठी तसेच वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत होता. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर विविध विभागांमध्ये व्यापक मोहीम हाती घेऊन ही कारवाई करण्यात आली.
यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. बेकायदा फेरीवाल्यांविरोधातील ही मोहीम यापुढेही सुरू राहील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
त्यानुसार सीएसएमटी, कुर्ला, दादर, बोरीवली भागातील अत्यंत वर्दळीचे परिसर केले फेरीवालामुक्त करण्यात आले आहेत.