Join us

तुम्ही रिडेव्हलपमेंट करा, नाही तर आम्ही ताबा घेऊ; म्हाडाच्या रडारवर जुन्या इमारती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 9:36 AM

दक्षिण मुंबईतल्या सुमारे १४ हजार उपकर प्राप्त इमारतींपैकी बहुतांशी इमारती धोकादायक ते अतिधोकादायक झाल्या असून, ऐन पावसाळ्यात त्या पडण्याच्या घटना घडत आहेत.

मुंबई : दक्षिण मुंबईतल्या सुमारे १४ हजार उपकर प्राप्त इमारतींपैकी बहुतांशी इमारती धोकादायक ते अतिधोकादायक झाल्या असून, ऐन पावसाळ्यात त्या पडण्याच्या घटना घडत आहेत. यावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून म्हाडाकडून संबंधित इमारतींच्या जमीन मालकांसह इमारतींमधील रहिवाशांना नोटीस बजावत पुनर्विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे. दोघांकडूनही प्रतिसाद मिळत नसेल, तर म्हाडा स्वत:चा अशा इमारती ताब्यात घेत पुनर्विकासाची प्रक्रिया राबवित असून, आता ८४९ इमारतींच्या मालकांना नोटिसा दिल्या आहेत. त्यापैकी ४१ जमीन मालकांनी पुनर्विकासाचे प्रस्ताव म्हाडाकडे दाखल केले आहेत.

ग्रँटरोड येथील सैदुन्निसा या इमारतीच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबई शहर आणि उपनगरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषत: दक्षिण मुंबईतील १४ हजार सेस इमारतींपैकी बहुतांशी इमारती धोकादायक आणि अतिधोकादायक  असून, यातील लाखो रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. यावर खबरदारीचा उपाय म्हणून म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतच्या कार्यवाहीला वेग दिला असून, अशा इमारतींच्या मालकांसह रहिवाशांना नोटीस बजावत सुनावणी घेतली जात असून, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करून दिला जात आहे.

१) पहिल्या टप्प्यात मालकाला नोटीस दिली जाते. पुनर्विकासाच्या प्रक्रियेसाठी ६ महिन्यांचा वेळ दिला जातो. दुसऱ्या टप्प्यात इमारतींमधील रहिवाशांना नोटीस दिली जाते. 

२) रहिवाशांनीही नोटिसीकडे दुर्लक्ष केले, तर मग म्हाडा स्वत: ही इमारत ताब्यात घेत पुनर्विकासासाठी हालचाल करते.

३) ८४९  जमीन मालकांना नोटीस.

४) ३३० प्रकरणांवर सुनावणी.

५) ३२२ भाडेकरूंच्या इमारतींना नोटीस.

६) १२० प्रकरणांत आदेश निघाले.

७) ४१ मालकांकडून म्हाडाकडे पुनर्विकासाचे प्रस्ताव.

८) ९  रहिवासी इमारतींकडून पुनर्विकासाचे प्रस्ताव.

संक्रमण शिबिरांमध्ये जायला नकार का? 

१)  म्हाडाकडून संबंधित प्रकरणांत प्रयत्न केले जातात. मात्र, कधी मालक तर कधी रहिवासी सहकार्य करत नाहीत किंवा अंतर्गत वादामुळे पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत नाही.

२) पुनर्विकासादरम्यान दक्षिण मुंबईतल्या रहिवाशांना पूर्व किंवा पश्चिम उपनगरातल्या संक्रमण शिबिरात घरे दिली जातात. मात्र, प्रत्यक्षात सगळा कारभार दक्षिण मुंबईत असणाऱ्या रहिवाशांना पूर्व किंवा पश्चिम उपनगरातील संक्रमण शिबिरे व्यावहारिकदृष्ट्या परवडत नाहीत. त्यामुळे संक्रमण शिबिरे नाकारली जातात.

टॅग्स :मुंबईम्हाडा