मुंबई : गेले काही दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने भुलेश्वर मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी येणे टाळले होते. मात्र, पाऊस कमी होताच आता घाऊक व्यापारी आणि विक्रेत्यांनी भुलेश्वर मार्केटमध्ये राख्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. भावाबहिणीच्या पवित्र नात्याचा राखीपाैर्णिमा सण काही दिवसांवर आला आहे.
मुंबईत अजूनही राख्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटलेली दिसत नाहीत. काही मोठ्या दुकानांमध्ये राख्यांची विक्री सुरू झाली आहे.
कार्टून राख्यांचे आकर्षण-
१) रक्षाबंधनानिमित्तबाजारात विविध रंगांच्या व लहान मुलांसाठी कार्टूनच्या राख्या विक्रीस आल्या आहेत.
२) यामध्ये सिल्व्हर, गाेल्डन काेट असलेल्या राख्या महाग असल्या तरी दिसण्यास आकर्षक असल्याने बहिणी आपल्या भावांसाठी त्या खरेदी करताना दिसून येत आहेत.
३) कार्टुनच्या राख्यांना पसंती आहे. तसेच बाजारात गाेंडा राखी, राजस्थानी राखी, रेशीम राखी, स्पायडरमॅन, मिकीमाऊस, डोनाल्ड डक, स्टोन राखी, डिस्को लाईट, छोटा भीम या राख्यांनाही पसंती आहे.
‘देव’ राखी महागली -
१) मानाची राखी म्हणून ओळख असलेल्या ‘देव’ राख्यांचेही भाव वाढले आहेत.
२) दोन ते अडीच रुपये डझन असणाऱ्या या राख्यांची किंमत वाढली आहे. काही ठिकाणी ५ रुपये तर कुठे ६ रुपये डझन भाव आहे.
३) विशेष म्हणजे या राख्या देव पूजनासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात.
यंदा राखींच्या किमतीत कुठलीही वाढ झाली नाही. मात्र, देव राखीच्या किमतीत थोडीफार वाढ झाली आहे. मात्र, कच्च्या मालाच्या किमतीतही कोणतीच वाढ झाली नसल्याने आम्हाला थोडा दिलासा मिळाला आहे. - राम त्रिवेदी, विक्रेते