Join us

जास्तीचे पाणी, वाया नका घालवू ! सातही धरणांतील साठा केवळ १६ टक्क्यांवर आल्याने मनपाचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 9:44 AM

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा सध्या केवळ १६ टक्क्यांवर आला आहे.

मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा सध्या केवळ १६ टक्क्यांवर आला  असून, हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षांतील नीचांकी आहे. दरम्यान, मुंबईसाठी राज्य शासनाने यापूर्वीच भातसा व अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून ३१ जुलैपर्यंत पुरेल, असे उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन केल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.

त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करू नये, परंतु पाणीसाठा उपलब्ध असला तरी सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन ही गगराणी यांनी मुंबईकरांना केले आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील आजघडीला उपलब्ध पाणीसाठा व नियोजन यासंदर्भात आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त गगराणी यांच्या उपस्थितीत मंगळवारी आढावा बैठक झाली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त चक्रधर कांडलकर, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे उपस्थित होते. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये मिळून सध्या २ लाख ३८ हजार ५५२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर गरजेच्या तुलनेत हा साठा १६.४८ टक्के आहे. भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लिटर, तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. 

एकूणच पाणीसाठ्याच्या स्थितीवर महापालिका प्रशासन सातत्याने व अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

मान्सूनचा अंदाज व साठ्याचा आढावा-

१) भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होण्यासाठी सध्या अनुकूल स्थिती आहे. देशात यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज याआधीच वर्तविण्यात आला आहे. 

२) मे अखेरीस हवामान खात्याकडून मान्सूनविषयक अद्ययावत अंदाज वर्तविले जाणार आहेत. हवामान खात्याकडून वेळोवेळी वर्तवले जाणारे पावसाचे अंदाज लक्षात घेऊन, त्याचप्रमाणे पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. त्यामध्ये होणारे बदल लक्षात घेऊन आगामी काळातील धोरण निश्चिती केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

गेल्या ३ वर्षांतील ७ मे रोजी पाणीसाठा-

२०२४    २३८५५२ द. लि.                     १६.४८% २०२३    ३२२०४९ द. लि.                      २२.२५%२०२२    ३७३४९१ द. लि.                      २५.८०%

‘शॉवरचा वापर टाळा’-

१)  पालिकेने सध्या सध्या तरी पाणी कपात लागू केलेली नाही. असे असले तरी मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, नागरिकांनी आणि व्यावसायिक आस्थापनांनाही योग्यप्रमाणे वापर करून पाण्याची बचत करावी, असे आवाहन गगराणी यांनी केले आहे. 

२) आवश्यक तितकेच पाणी घेऊन प्यावे, शॉवरचा उपयोग न करता बादलीत पाणी घेऊन अंघोळ करावी, घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका, भांड्यांमध्ये पाणी घेऊन कामे उरकावीत, वाहने धुण्यासाठी पाइपचा वापर टाळा, लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुऊन काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या, आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका, वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास पाण्याचा वापर कमी होऊ शकतो. 

३) उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यात पाणी द्यावे, घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कोठेही गळती असल्यास दुरुस्ती करावी, असेही गगराणी यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईपाणीकपात