विधानसभेला मतदान सोपे, १० हजार १११ मतदान केंद्रे; लोकसभेच्या तुलनेत २१८ ची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 10:35 AM2024-09-21T10:35:03+5:302024-09-21T10:36:53+5:30

विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे.

in mumbai assembly voting made easy about 10 thousand 111 polling stations an increase of 218 compared to lok sabha | विधानसभेला मतदान सोपे, १० हजार १११ मतदान केंद्रे; लोकसभेच्या तुलनेत २१८ ची वाढ

विधानसभेला मतदान सोपे, १० हजार १११ मतदान केंद्रे; लोकसभेच्या तुलनेत २१८ ची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या आता १० हजार १११ इतकी झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान केंद्रांच्या संख्येत २१८ ने वाढ झाली आहे, तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर पूर्वी असणारी सरासरी एक हजार ५०० मतदारांची संख्या ही आता सरासरी एक हजार २०० पर्यंत असेल. मतदान केंद्रांची संख्या वाढल्याने मतदान प्रक्रियेस वेग येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. बृहन्मुंबई क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी एक हजार २०० पर्यंत मतदारसंख्या राहील, हे सूत्र लक्षात ठेवून मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे, तर अधिक मतदान केंद्र असणाऱ्या एकाच ठिकाणावरील मतदान केंद्रांचे विक्रेंद्रीकरण केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काही भागांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे. मतदान केंद्रांमध्ये झालेल्या सुसूत्रीकरणाची माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली.

आपले मतदान केंद्र जाणून घ्या !

१)  सुसूत्रीकरण केल्याने मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये झालेल्या नवीन बदलांसंदर्भात मतदारांना माहिती देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

२)  याअंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये झालेल्या बदलांची माहिती देतील. याशिवाय, नोंदणीकृत मतदारांना  पत्राद्वारे तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही माहिती देण्यात येईल, असेही प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. 

अशी वाढली केंद्रे-

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये दोन हजार ५०९ मतदान केंद्र होते, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात ही संख्या सात हजार ३८४ होती. सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे मतदान केंद्रांची संख्या अनुक्रमे दोन हजार ५३७ आणि सात हजार ५७४ इतकी झाली आहे.

Web Title: in mumbai assembly voting made easy about 10 thousand 111 polling stations an increase of 218 compared to lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.