Join us  

...तर ४६२ मालमत्तांचा पालिकेकडून लिलाव; करचुकव्या मालमत्ताधारकांना नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 10:40 AM

मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात पालिकेकडून आता कठोर कारवाई केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात पालिकेकडून आता कठोर कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून तब्बल विविध ४६२ मालमत्ताधारकांना जप्तीच्या कारवाईसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भातील कारवाईला लवकरच सुरूवात होणार असून, या मालमत्तांचा लिलावही करण्यात येणार आहे. त्यातून पालिकेच्या महसूलात मोठी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

मालमत्ता कर हा मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत महापालिकेकडे मालमत्ता कर जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महापालिकेकडून टप्प्याटप्प्याने कारवाई होते. मालमत्ता कर न भरल्यास ‘डिमांड लेटर’ पाठविण्यात येते. पुढच्या टप्प्यात मालमत्ताधारकाला २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. मात्र, गेल्या दहा-बारा वर्षांत मालमत्ता कर न भरणाऱ्यांची यादी वाढतच आहे. त्यामुळे अखेर त्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. 

ई-लिलाव होणार-

१) के पश्चिम विभागातील मालमत्तेच्या थकीत मालमत्ता कराच्या वसुलीप्रकरणी पालिकेकडून काही वाहने जप्त करण्यात आली. या वाहनांचा पालिकेकडून ई-पद्धतीने लिलाव करण्यात येणार आहे.

२) यासाठी २३ ऑगस्टपर्यंत ही वाहने निरीक्षणासाठी ठेवण्यात येणार असून, मग त्यांची विक्री होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तीन दिवसात कर भरण्याचे आवाहन-

पालिकेने नोटीस पाठवलेले ४६२ थकबाकीदार हे निवासी, औद्योगिक, वाणिज्य, खुली जागा अशा विविध वर्गातील आहेत. पालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने या थकबाकीदारांना पत्र पाठवले असून, कोणतेही कारण न देता तीन दिवसात कर भरण्याचे आवाहन केले आहे. करभरणा न केल्यास मुंबई महापालिका कायदा १८८८ नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे. त्यात दंड आकारण्यापासून मालमत्ता जप्ती आणि त्याचा लिलाव करण्याच्या कारवाईचा समावेश आहे. महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून थकबाकीदारांविरोधात जोरदार मोहिम उघडली आहे.

नोटीसप्राप्त मालमत्ताधारकांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी तत्काळ कराचा भरणा करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाकर