Join us

‘ऑटोमॅटिक वेदर स्टेशन’साठी कोणी तरी जागा देईल का ? पालिकेचा ६० केंद्रांसाठी शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 10:15 AM

 मुंबई शहर व उपनगरांतील पावसाचा दर १५ मिनिटांचा अद्ययावत अहवाल आणि कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाजासह अन्य मदत ही स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्राद्वारे (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) होते

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  मुंबई शहर व उपनगरांतील पावसाचा दर १५ मिनिटांचा अद्ययावत अहवाल आणि कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाजासह अन्य मदत ही स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्राद्वारे (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) होते. मुंबईत सध्या पालिकेने उभारलेली अशी ६० केंद्रे आहेत, तर आणखी ६० केंद्रे उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र मुंबईत जागेअभावी ही प्रक्रिया रखडल्याचे उघडकीस आले आहे. 

हवामान विभागाची मुंबईत केवळ कुलाबा आणि सांताक्रूझ येथेच केंद्र असून, त्यांच्याकडून मिळणारी माहिती ही मुंबईचा भौगोलिक विस्तार लक्षात घेता अत्यंत मर्यादित असते. त्याउलट, पालिकेने ठिकठिकाणी बसविलेल्या १२० ऑटोमॅटिक वेदर स्टेशनमधून रोजच तपशीलवार माहिती हवामान विभागाला प्राप्त होते. यात वेगवेगळ्या भागात झालेला पाऊस, तापमान, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा आणि वेग, अशी माहिती असते. ही माहिती हवामान विभागासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने ही केंद्र वर्षभर सुरू ठेवावीत, अशी शिफारस या विभागाने पालिकेकडे केली आहे.

गगनचुंबी इमारतींमुळे अडथळा-

१) ऑटोमॅटिक वेदर स्टेशन उभारण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मुंबईत आणखी ६० ठिकाणी ही यंत्रणा बसविण्याची गरज आहे. पण गगनचुंबी इमारतींच्या जाळ्यामुळे त्यासाठी आवश्यक असलेली जागा पालिकेला उपलब्ध करून देता येत नाही. 

२) सध्या सुरू असलेली केंद्रेसुद्धा पालिकेच्या शाळा, आरोग्य केंद्र अशा ठिकाणी आहेत, या बाबीकडे पालिकेच्या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. 

३) मुंबईत मोकळ्या जागेची वानवा असल्याने स्वयंचलित हवामान केंद्रांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर अशा केंद्रांच्या तारांचा वापर हा स्थानिक रहिवाशांकडून कपडे वाळत टाकण्यासाठी केला जातो, अशी तक्रारही आहे.

२० ठिकाणी ‘एक्यूएम’ बसविण्याची योजना-

मुंबईत हवेचा दर्जा तपासण्यासाठी सध्या केवळ सहा ठिकाणी एक्यूएम (हवेचा दर्जा नियामक) केंद्र कार्यरत आहेत. अशी केंद्र एकूण २० ठिकाणी सुरू करण्याची योजना आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाहवामान