लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. घरी नैवेद्य, प्रसादासाठी अनेक पदार्थ केले जातात. प्रसाद, नैवेद्यांमध्ये वैविध्य जपले जाते. मात्र, हे करत असताना खाद्यतेल मोठ्या प्रमाणात लागते. काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या किमतींमध्ये १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या दरामुळे गृहिणींचे बजेट बिघडलेले दिसत आहे. आता स्वयंपाकघरातील फोडणी महाग झाली आहे.
महिन्याभरापूर्वी १२० रुपये किलो दराने मिळणारे सोयाबीन तेल आता १४० ते १५० रुपये किलो दराने मिळत आहे. केंद्र सरकारने तेलावरील एक्साइज ड्यूटी वाढवल्यामुळे ही दरवाढ झाली आहे. भारत वनस्पती तेलाची बरीचशी मागणी आयातीद्वारे पूर्ण करतो. पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. मात्र, त्या त्या देशातील परिस्थितीनुसार पुरवठा कमी झाला किंवा दरवाढ झाली तर त्याचा थेट परिणाम दरांवर होतो.
महिन्याला काटकसर करून किराणा घेतला जातो. महिन्याला साधारणत: चार ते पाच लिटर तेल लागते. आता तेल विकत घेताना वाढलेले दर पाहून धक्काच बसला. दरवाढीमुळे महिन्याच्या बजेटमध्ये आणखी वाढ झाली आहे, असे गृहिणी कल्पना मिरेकर यांचे म्हणणे आहे.टट
एक्साइज ड्यूटी वाढल्यामुळे तेलाचे भाव वाढले आहेत. ग्राहकांनी किराणा व्यावसायिकांबाबत गैरसमज करू नये. घाऊक बाजारामध्ये दर प्रति दहा किलोमागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये २ ते ४ लिटरप्रमाणे तेलाची खरेदी केली जाते. त्यामुळे त्या ग्राहकांना प्रतिलिटर १० ते २० रुपये दरवाढ सहन करावी लागत आहे. - योगेश आलटकर, घाऊक व्यापारी.
गृहिणींसाठी डोकेदुखी-
१) तेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने होणारी दरवाढ गृहिणींसाठी डोकेदुखी ठरली आहे. राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या विचार करून दरवाढीसंदर्भात निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा गृहिणींमधून व्यक्त होत आहे.
२) महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबीयांना दर महिन्याला खर्चाचे नियोजन करणे अवघड होत चालले आहे. दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तूंमागे एक्साइज ड्यूटी वाढवून भाववाढ झाली तर आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न महिलावर्ग विचारत आहे.