मुंबई : मुंबई पालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग आणि मेक अर्थ ग्रीन अगेन (एमईजीए) फाउंडेशनच्या सहकार्याने वांद्रे येथील खेरवाडी येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ अभिनेता अक्षय कुमार आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते सोमवारी बहावाच्या रोपांची लागवड करण्यात आली. या मोहिमेत बहावाची ३०० झाडे लावण्यात येणार असून पर्यावरण संतुलनासाठी पालिकेचा हा प्रयत्न असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तौक्ते चक्रीवादळानंतर मुंबईतही अनेक वृक्षांची पडझड झाली. त्यातून झालेले पर्यावरणाचे नुकसान भरून काढण्यासाठी ‘झाडांचा खड्डा स्वीकारा आणि निसर्गाचे पालक बना’ या मोहिमेत आतापर्यंत ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, बप्पी लाहिरी, अजय देवगण आणि त्यांचा मुलगा युग देवगण, सोनू निगम, संग्राम सिंह, रणवीर शौरी, त्यांचा मुलगा हारून शौरी, रोहित शेट्टी तसेच ज्येष्ठ अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी, सोनाक्षी सिन्हा, आयेशा झुल्का आदींनी सहभाग नोंदविला आहे.
‘जागतिक वृक्ष नगरी’चा दोनदा मिळाला पुरस्कार -
१) सोमवारी अभिनेता अक्षय कुमार यांनी त्यांचे दिवंगत वडील हरीओम भाटिया आणि आई अरुणा भाटिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या झाडांचे रोपण केले.
२) मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महापालिका सतत नवनवीन उपक्रम राबवत असते. मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी महापालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांची दखल अलीकडे जागतिक स्तरावरही घेण्यात आली आहे.
३) अन्न आणि कृषी संघटना आणि आर्बर डे फाऊंडेशनकडून ‘जागतिक वृक्ष नगरी’चा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार २०२१ आणि २०२२ अशी सलग दोन वर्षे मुंबई महानगराला मिळाला आहे.
४) महापालिकेच्या उद्यान विभागाने आतापर्यंत मियावाकी पद्धतीने चार लाखांपेक्षा अधिक झाडे लावली आहेत. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने २५ हजार झाडे लावण्यात येतात. त्यामुळे आज मुंबई महानगराच्या वृक्षसंपदेने ३३ लाखांचा आकडा ओलांडला आहे.