वांद्रे ते मरिन ड्राइव्ह प्रवास लवकरच सुसाट; कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंकची जोडणी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 09:28 AM2024-05-16T09:28:33+5:302024-05-16T09:30:40+5:30

बुधवारी पहाटे ६ वाजून ७ मिनिटांनी महाकाय बो आर्च स्ट्रिंगचा दुसरा गर्डरदेखील यशस्वीपणे बसवण्यात आला. 

in mumbai bandra to marine drive journey faster coastal road and bandra worli sea link connection complete | वांद्रे ते मरिन ड्राइव्ह प्रवास लवकरच सुसाट; कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंकची जोडणी पूर्ण

वांद्रे ते मरिन ड्राइव्ह प्रवास लवकरच सुसाट; कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंकची जोडणी पूर्ण

मुंबई : कोस्टल रोड अन् वांद्रे-वरळी सी लिंकची जोडणी अखेर पूर्ण झाली आहे. बुधवारी पहाटे ६ वाजून ७ मिनिटांनी महाकाय बो आर्च स्ट्रिंगचा दुसरा गर्डरदेखील यशस्वीपणे बसवण्यात आला. खुल्या समुद्रात लाटांचा अंदाज घेत मोठ्या तराफ्याच्या मदतीने हा गर्डर बसवण्याचे काम करण्यात आले. यामुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग एकमेकांना पूर्णपणे जोडले गेले आहेत. त्यामुळे आता लवकरच मुंबईकरांना वांद्रे ते मरिन ड्राइव्ह प्रवास अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे.

सकाळी ६:०७ वाजता मोहीम फत्ते-

कोस्टल रोड आणि सी लिंक जोडणीचा पहिला गर्डर २५ एप्रिल रोजी पालिका प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. तर, बुधवारी पहाटे ३ वाजल्यापासून दुसरा गर्डर ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले. हवामानाचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने दुसरा गर्डर पहिल्या गर्डरकडे सरकविण्यात आला. 

दुसच्या गर्डरचे चारही बाजूचे कोन तंतोतंत जुळल्यानंतर पहाटे ६ वाजून ७ मिनिटांनी अडीच हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर यशस्वीपणे जोडण्यात आला. महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, प्रमुख अभियंता गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी आदी उपस्थित होते.

२,५०० मेट्रिक टन गर्डरचे वजन-

मुंबई किनारी रस्त्यावर स्थापन केलेल्या पहिल्या गर्डरच्या तुलनेने दुसरा गर्डर वजनाने जास्त आहे. त्याची लांबी १४३ मीटर, रुंदी ३१.७ मीटर, उंची ३१ मीटर आहे, तर वजन अडीच हजार मेट्रिक टन आहे. अंबाला येथून या गर्डरचे लहान सुटे भाग आणून जोडण्यात आले. नंतर न्हावा बंदरातून १२ मे रोजी दुसरा गर्डर घेऊन बार्ज निघाला होता.

सावधानता अन् उत्सुकता-

१) पहिला गर्डर बसविताना आजूबाजूला मोकळी जागा असल्याने अभियंत्यांना अंदाज घेण्यासाठी पुरेसा वाव होता; परंतु दुसरा गर्डर बसवताना तितकीशी मोकळीक नव्हती. पहिल्या गर्डरचा अंदाज घेत सावधपणे मोहीम पार पाडण्याचे मोठे आव्हान होते. 

२) पहिल्या गर्डरपासून अवघ्या २.८ मीटर अंतरावर दुसरा गर्डर स्थापन करणे काहीसे जोखमीचे होते; परंतु या प्रकल्पावर काम करणारे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी आणि कामगार यांनी अतिशय कुशलतेने मोहीम राबवली. 

३) मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूदरम्यान स्थापन केलेल्या दोन्ही गर्डरवर पुढील टप्प्यात क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या गर्डरला गंज चढू नये, यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 

४) प्रगत वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे गर्डरचे सुटे भाग एकमेकांना जोडण्यात आले आहेत.

Web Title: in mumbai bandra to marine drive journey faster coastal road and bandra worli sea link connection complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.