‘बाणगंगा’चे पुनरुज्जीवन रखडणार; विलंब टाळण्यासाठी २ ऐवजी ३ कंत्राटदारांची नियुक्ती होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:38 AM2024-09-25T10:38:02+5:302024-09-25T10:40:51+5:30

मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत या तलावातील गाळ काढण्यासाठी महापालिका कंत्राटदाराने जेसीबी यंत्राचा वापर केला होता.

in mumbai banganga revival to be halted instead of two three contractors will now be appointed to avoid delays | ‘बाणगंगा’चे पुनरुज्जीवन रखडणार; विलंब टाळण्यासाठी २ ऐवजी ३ कंत्राटदारांची नियुक्ती होणार

‘बाणगंगा’चे पुनरुज्जीवन रखडणार; विलंब टाळण्यासाठी २ ऐवजी ३ कंत्राटदारांची नियुक्ती होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत या तलावातील गाळ काढण्यासाठी महापालिका कंत्राटदाराने जेसीबी यंत्राचा वापर केला होता. त्यामुळे पायऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अद्याप नव्या कंत्राटदारांची नियुक्ती न झाल्याने तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम रखडले आहे. या कामासाठी आता दोनऐवजी तीन कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार आहे.

बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. मात्र, पहिल्या कंत्राटदाराच्या चुकीनंतर जुलैपासून तलावाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. आता हे काम मार्गी लावण्यासाठी कंत्राटदार नेमण्याचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. काही कामे पालिकेच्या इंजिनिअरिंग विभागाच्या, तर काही कामे हेरिटेज विभागाच्या अखत्यारीत येतात. त्या अनुषंगाने  इंजिनिअरिंग संदर्भातील विविध कामांसाठी दोन, तर हेरिटेज संदर्भातील कामांसाठी एका कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे.

जुलैपासून काम थंड-

बाणगंगा तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा, तलावाच्या सभोवतालचा रस्ता विकसित करणे, अतिक्रमणे हटवणे, रंगरंगोटी करणे, तलावास लागून असलेल्या इमारतीच्या भिंतीवर चित्रे  रेखाटणे, रामकुंड स्थळाचे पुनरुज्जीवन, तलाव ते अरबी समुद्रादरम्यान मार्गिका तयार करणे, तलावाकडे जाणार मार्ग विकसित करणे, दीपस्तंभाची उभारणी आदी कामे केली जाणार आहेत.

जुलैमध्ये या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती. काम करण्यासाठी कंत्राटदाराने तलावात जेसीबी यंत्र उतरविले होते. या यंत्रामुळे तलावाच्या पायऱ्यांची 
हानी झाली होती. 

पालिकेने त्यामुळे कंत्राटदाराला नोटीस बजावली होती. तसेच गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर पायऱ्यांच्या दुरुस्तीचे काम पालिकेने पूर्ण केले. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आले. तेव्हापासून नव्या कंत्राटदारांची नियुक्ती रखडली आहे. तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम तीन टप्प्यांत होणार आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार हे काम पालिकेने हाती घेतले आहे.

Web Title: in mumbai banganga revival to be halted instead of two three contractors will now be appointed to avoid delays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.