Join us

बीडीडीचा मेकओव्हर! ४० मजली ८ इमारतींचे बांधकाम जोरात; पुढच्या वर्षी घरांचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 9:56 AM

म्हाडाच्या वतीने वरळी येथे हाती घेण्यात आलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू आहे.

सचिन लुंगसे,लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : म्हाडाच्या वतीने वरळी येथे हाती घेण्यात आलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू आहे. पोलीस मैदान येथे रहिवाशांसाठी बांधण्यात येत असलेल्या ४० मजल्यांच्या आठ इमारतींपैकी डी आणि इ या बिल्डिंगचा ताबा २०२५ च्या मार्च महिन्यात ५५० कुटुंबांना दिला जाईल. 

 या घराचा ताबा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दिला जाणार होता. मात्र, या इमारतींचे रंगरंगोटीचे काम आणि लिफ्टचे काम बाकी असल्याने ताबा देण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. १२१ बीडीडी चाळी आहेत. या चाळीमध्ये दहा हजार रहिवासी राहत आहेत. येथील चाळीच्या पुनर्विकासासाठी एकूण ३३ इमारती बांधल्या जाणार आहेत. 

वरळी परिसरातील हॉस्टेलच्या मोकळ्या मैदानात सरकारी इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. इमारत क्रमांक  ७८, ७९, ८०, ८१, ९२, ५९, ६०, ६१ यांची लॉटरी झाली असून येथील रहिवाशांची स्थलांतर प्रक्रिया चालू आहे. पुनर्विकास प्रकियेमध्ये ट्रान्झिट कॅम्प म्हणून श्रीनिवास मिल, सेंचुरी मिल, बॉम्बे डाइंग मिल येथे रहिवासी स्थलांतरित झाले असून काही रहिवाशांनी भाडे घेऊन स्थलांतर केले आहे. - किरण माने, सरचिटणीस, अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समिती

मडकेबुवा मैदानात पायलिंगचे काम सुरू

१) जेथे विकण्यासाठीची घरे बांधली जाणार आहेत त्या मडकेबुवा मैदानात पायलिंगचे काम सुरू झाले आहे. 

२) १८, १९, २० या इमारतींमधील रहिवाशांची लॉटरी झाली असून, दिवाळीपर्यंत त्या इमारती रिकाम्या केल्या जातील आणि पाडल्या जातील. 

३) साने गुरुजी मैदान येथील मैदानात ३ विंगचे काम पायलिंगपर्यंत झाले आहे. त्या सभोवतालच्या १०८, १०९, इमारती रिकाम्या करून तोडण्यात आल्या आहेत. इमारत क्रमांक ९३, ९० रिकाम्या झाल्या असून त्या पाडल्या जातील आणि तेथे नव्या इमारतीचे बांधकाम सुरू केले जाईल.

टॅग्स :मुंबईम्हाडावरळी