गणेशोत्सवात कार्यतत्पर, सजग राहा! आयुक्तांच्या सूचना; जुहू, वर्सोवा चौपाटीची केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 09:34 AM2024-09-04T09:34:40+5:302024-09-04T09:35:45+5:30
गणेशोत्सव कालावधीत सार्वजनिक स्वच्छता आणि सुस्थितीतील रस्ते या दोन्हींवर प्राधान्याने लक्ष पुरवावे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :गणेशोत्सव कालावधीत सार्वजनिक स्वच्छता आणि सुस्थितीतील रस्ते या दोन्हींवर प्राधान्याने लक्ष पुरवावे. उत्सव कालावधीत पालिका अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी अधिक कार्यतत्पर, सजग राहावे. भाविक, नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी संबंधितांना दिले.
गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य कलशाची व्यवस्था, वैद्यकीय चमू, जीवरक्षकांची नेमणूक, सार्वजनिक स्वच्छतेकडे सर्व यंत्रणांनी लक्ष पुरवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर नागरी सेवासुविधाविषयक तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त भूषण गगराणी यांनी जुहू आणि वेसावे (वर्सोवा) चौपाटीची पाहणी केली.
यावेळी सहआयुक्त विश्वास शंकरवार, के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. पाहणीदरम्यान त्यांनी नागरिक, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षारक्षक, जीवरक्षक यांच्याशी संवाद साधला.
पोलिसांशी समन्वय साधा-
१) रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, स्वच्छता, विसर्जन मार्गांवर वृक्ष छाटणी आदी कामे सुरू आहेत.
२) पालिकेने धोकादायक पुलांची नावे जाहीर केली आहेत.
३) त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून रहदारी सुरळीत ठेवावी.
४) गणेशोत्सव काळात अधिक सजग, कार्यतत्परपणे कामकाज करणे आवश्यक आहे, अशा सूचनाही आयुक्त भूषण गगराणी यांनी केल्या आहेत.
मुख्य रस्ते, गल्लीबोळ, समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता ठेवा-
१) मुख्य रस्त्यांबरोबरच लहान रस्ते, गल्लीबोळ, झोपडपट्टी अशा सर्व ठिकाणी स्वच्छता राखावी. समुद्रकिनारे, चौपाटींवर अधिक स्वच्छता ठेवावी. कचरा संकलन करावे, अशा सूचना आयुक्त भूषण गगराणी यांनी संबंधितांना दिल्या.
२) कृत्रिम तलाव, वाहन आधारित फिरते कृत्रिम तलाव, निर्माल्य वाहक फिरते वाहन, लोंबकळणाऱ्या तारा, विसर्जनस्थळावर कार्यरत स्वयंसेवक, पेयजल, प्रसाधनगृह, वाहनतळ, जर्मन तराफे, निर्माल्य कलश आदींचा गोष्टींचाही गगराणी यांनी आढावा घेतला.