Join us  

खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणे भोवले; पालिकेच्या २ अभियंत्यांना नोटिसा, अतिरिक्त आयुक्तांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 9:39 AM

पावसाळ्यात खड्ड्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून २२७ निवडणूक प्रभागांमध्ये दुय्यम अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई : पावसाळ्यात खड्ड्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून २२७ निवडणूक प्रभागांमध्ये दुय्यम अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, तरीही खड्ड्यांच्या तक्रारींकडे अभियंत्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने दोन दुय्यम अभियंत्यांना कारणे नोटिसा बजावल्या आहेत. 

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड व भांडुप व्हिलेजमधील रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुय्यम अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ संबंधित दुय्यम अभियंत्यांना नोटीस बजावण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच यापुढेही अभियंत्यांकडून खड्ड्यांच्या बाबतीत हलगर्जी होऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

मुंबईतील रस्ते, मुख्य रस्ते त्याचबरोबर द्रुतगती महामार्गांच्या देखभाल-डागडुजीची जबाबदारी पालिकेची आहे. मुंबई महानगरात कमी वेळेत जास्त पडणारा पाऊस, विविध प्रकारच्या वाहनांची वर्दळ, वाहतूक घनता, विविध उपयोगिता सेवा वाहिन्यांसाठी खोदलेले चर या विविध कारणांमुळे रस्त्यांची हानी होते. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाल्यास, रस्त्यात खड्डा आढळल्यास अशा बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत. दुय्यम अभियंत्यांनी अधिक सक्रियपणे खड्डे शोधावेत आणि भरावेत, अशा स्पष्ट सूचना बांगर यांनी अभियंत्यांना दिल्या होत्या. 

शिवाय बघ्याची भूमिका न घेता प्रसंगी कारवाई करू, अशी सक्त ताकीदही दिली होती. मात्र तरीही वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याने दुय्यम अभियंत्यांना त्यांनी कारणे नोटीस बजावली आहे. 

दरम्यान, यानंतरही जर दुय्यम  अभियंते, संबंधित कर्मचाऱ्यांकडून अशी हलगर्जी झाल्यास बघ्याची भूमिका न घेता प्रसंगी कारवाई करू, अशी सक्त ताकीदही बांगर यांनी दिली आहे.

२४ तासांमध्ये खड्डे भरण्याचे आदेश -

१) अतिवृष्टीमुळे आता रस्त्यांवर खड्डे दिसू लागले आहेत. त्यामुळे २२७ दुय्यम अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात रस्त्यांवर उतरले पाहिजे. दुरुस्ती योग्य रस्ते, खड्डे शोधले पाहिजेत. स्वत:हून खड्डे भरण्याची कार्यवाही पूर्ण केली पाहिजे, अशी अपेक्षा अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केली आहे. 

२) नागरिक, लोकप्रतिनिधी, माध्यमे आणि समाज माध्यमांद्वारे आलेल्या प्रत्येक तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

३) प्रसंगी महापालिकेच्या विविध विभागांशी समन्वय साधून खड्डे भरण्याची कार्यवाही प्राधान्याने हाती घेतली पाहिजे, असे बांगर यांनी म्हटले आहे. 

४) महत्त्वाचे म्हणजे रस्ते दुरुस्ती कामामध्ये अभियंत्यांकडून तत्परता दिसली पाहिजे, खड्डा दिसल्यास तो पुढील २४ तासांत भरावा, असे अभिजित बांगर यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाखड्डे