अनंत चतुर्दशीपूर्वी खड्ड्यांचे विघ्न होणार दूर; पावसाने उसंत घेतल्याने कामाला वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:05 AM2024-09-11T10:05:36+5:302024-09-11T10:08:13+5:30
विसर्जन मार्गात खड्ड्यांचे विघ्न येऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विसर्जन मार्गात खड्ड्यांचे विघ्न येऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. अनंत चतुर्दशीपूर्वी सर्व खड्डे बुजविण्यात येणार आहेत. सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे खड्डे भरणे सोपे झाले आहे, शिवाय भरलेले खड्डे पुन्हा उखडण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
ऑगस्टमध्ये पालिकेने खड्डे बुजविण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, तेव्हा मुसळधार पाऊस झाल्याने खड्डे बुजविण्याची मोहीम यशस्वी ठरली नव्हती, तरीही खड्डे बुजविण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरूच होते. दरवर्षी सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर ओसरल्यावर खड्डे बुजविण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले जाते. यंदा मात्र, भर पावसातही खड्डे भरण्याची कामे सुरू होती. त्यामुळे भरलेल्या खड्ड्यांतील मिश्रण टिकत नव्हते.
दुसरीकडे पाऊस सुरू असतानाही खड्डे भरावेत, कोणत्या विभागांत खड्डे पडले आहेत, याचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी यंदा पालिका प्रशासनाने खास दुय्यम अभियंत्यांची नियुक्ती केली होती. या अभियंत्यांवर खड्डे भरणे आणि शोधणे एवढीच जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कामात कुचराई करणाऱ्या २० पेक्षा जास्त अभियंत्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे.
विसर्जन मार्ग, मुख्य रस्त्यांवर डागडुजी-
गणेशोत्सावात भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेने अगोदरच रस्त्यांची डागडुजी हाती घेतली होती. आता गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे विसर्जन मार्गांसह मुख्य रस्त्यांवरील डागडुजी करण्यावर भर दिला जात आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले.