गणपतीपूर्वी खड्ड्यांचे ‘विघ्न’ दूर; मनपाची १५ ऑगस्टनंतर खड्डे बुजविण्यासाठी विशेष मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 09:26 AM2024-08-14T09:26:50+5:302024-08-14T09:28:36+5:30
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे आगमन सुरू झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे आगमन सुरू झाले आहे. मात्र, या आगमन सोहळ्यात रस्त्यांवरील खड्डे आणि ते बुजवण्यासाठी केलेल्या खटाटोपामुळे बिघडलेला रस्त्यांचा समतोलाला गणेश मंडळांना सामोरे जावे लागत आहे. मात्र गणेश आगमनातील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी पालिका शहर आणि उपनगरात खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. गणेश आगमन आणि विसर्जनात खड्ड्यांमुळे बाधा येऊ नये हा या मोहिमेचा उद्देश असून नियोजनासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे.
पावसात मुंबईतील खड्ड्यांमुळे रस्त्यांची चलन होते मात्र यंदा खड्ड्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. १ जून ते ८ ऑगस्टदरम्यान २५ प्रभागांमधून जवळपास १४ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नियमित वाहतुकीचे तीन तेरा वाजलेच आहेत, मात्र आता गणेशोत्सवात याचा त्रास जास्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आता पुन्हा ‘ॲक्शन मोड’वर येणार आहे. सध्या पावसाने उसंत घेतल्याने अभियंत्यांना ही खड्डे बुजविताना त्रास होणार नाही आणि कामालाही वेग येईल. यामुळे पालिकेकडून लागलीच ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये विभागनिहाय रस्त्यांचे सर्वेक्षण करून खड्डे समपातळीत भरले जातील, असे बांगर यांनी नमूद केले.
मुंबईतील रस्ते हे खड्डे विरहितच हवेत, यात दुमत नाही. मात्र आता पावसाळ्यात जे काही खड्डे निर्माण झाले आहेत ते गणेश आगमनाआधी बुजवण्यासाठी ही विशेष आणि मोठी मोहीम असणार आहे. गणेश आगमन आणि विसर्जनाचे मार्ग यावर विशेष लक्ष देऊन नियोजन करण्यात येईल. - अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
समितीकडून आधीच पत्रव्यवहार-
१) बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून याआधीच पालिका अधिकाऱ्यांना पत्र लिहून आगमन आणि विसर्जन मार्गातील खड्ड्यांविषयी माहिती दिली आहे.
२) तसेच लवकरात लवकर बुजवण्याची कार्यवाही करावी, असेही नमूद केले आहे.
३) मात्र अद्यापही शहर व उपनगरातील महत्त्वाच्या रस्त्यावर खड्डे कायम आहेत तर अनेक ठिकाणी खड्डे बुजले तरी त्यामुळे असमतोल ठिकाणे तयार झाली आहेत.