मुंबई : नोकरदार वर्ग, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लोकलसह ‘बेस्ट’ बसचा प्रवासही गैरसोयीचा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेस्ट प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गोराई, बोरीवली पश्चिम भागातील प्रवासी हैराण झाले आहेत. सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत अनियमित, अपुऱ्या बससेवेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. काही प्रवासी रांगेत बसची वाट बघत ताटकळत उभे असतात, तर काही नागरिक जास्त पैसे देऊन शेअर रिक्षाचा पर्याय निवडतात. बराच वेळ बसची वाट पाहण्यातच जात असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.
बोरीवली, गोराईतील शाळेत, महाविद्यालयात जाणारी मुले, मुली, ज्येष्ठ नागरिक, रोज कार्यालयात जाणारे कर्मचारी बेस्टच्या सेवेवर अवलंबून असतात. खासकरून गोराई येथील बस क्रमांक २४७ आणि २९४ या सेवेवर येथील रहिवासी अवलंबून आहेत.
‘बसच्या सेवेत वाढ करा’-
१) सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी बस क्रमांक २४७ आणि २९४ या बस सेवांवर अवलंबून असणाऱ्यांची गैरसोय होत आहे, अशी तक्रार स्थानिक रहिवासी आणि ॲड. सागर गायकवाड यांनी केली.
२) गायकवाड यांनी माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांच्यासह काही प्रवाशांसह गोराई आगाराचे निरीक्षक राजू गवळी यांची भेट घेतली.
३) प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची माहिती देत त्यांनी बसची संख्या वाढविण्याची मागणी केली. गवळी यांनी बस संख्येत वाढ करण्याचे निर्देश दिल्याचे शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.