‘बेस्ट’ची ‘बस’कण; बिघाडात आघाडी, ५ वर्षांत ६७ हजार वेळा नादुरूस्त; मुंबईकर हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 09:47 AM2024-08-13T09:47:54+5:302024-08-13T09:49:07+5:30
मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट बस सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट बस सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे. पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार रस्त्यावरच बिघाड होणाऱ्या गाड्यांमध्ये कंत्राटीपेक्षा बेस्टच्या स्वमालकीच्या बसची संख्या पाच टक्के अधिक नोंदविण्यात आली असून, गेल्या वर्षभरात मात्र कंत्राटी गाड्या बिघडण्याचे प्रमाण दुपटीहून अधिक झाले आहे. २०२३ मध्ये बेस्ट बिघाडाची संख्या ६२७८ असून कंत्राटी बस बिघाडाचे प्रमाण १४,१६७ पर्यंत पोहोचले आहे.
२०१९ ते मार्च २०२४ मध्ये बेस्टच्या बसमध्ये एकूण ६७,८०४ वेळा बिघाड झाला आहे. त्यातही कंत्राटी पद्धतीने धावणाऱ्या गाड्यांमध्ये बिघाडाचे प्रमाण २९,२६९ इतके असून, बेस्टच्या गाडी बिघाडाचे प्रमाण ३८,५३५ इतके असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. नियमानुसार बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या ३,३३७ बसगाड्या असणे आवश्यक असूनही त्यांच्याकडे केवळ १,०८५ बसगाड्या आहेत. त्यातही अनेक बसगाड्यांचा फिटनेस कालावधी संपुष्टात येणार असल्याने २०२५ पर्यंत हा ताफा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. या जागी स्वमालकीच्या बस विकत घेण्यासाठी उपक्रमाकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक स्वमालकीच्या ‘अनफिट’ बस रस्त्यावर धावत असून, त्या बिघाडाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
खासगीकडे ओढा-
स्वमालकीच्या बस घेता येत नसल्याने उपक्रमाने खासगी कंत्राटदारांच्या बसचा ताफा वाढवण्यास सुरुवात केली आहे. २०१९ ते २०२३ या काळात बेस्टच्या बस बिघाडाची संख्या जास्त असली, तरी २०२२ ते मार्च २०२४ या काळात कंत्राटी बसमधील बिघाडाची संख्या अधिक आहे.
पालिकेकडून आर्थिक मदत मिळेना-
१) बेस्ट उपक्रम सध्या आर्थिक डबघाईला आला असून बेस्टला पालिकेच्या आर्थिक मदतीची गरज आहे.
२) ती मिळत नसल्याने बेस्टने कंत्राटीकरणाचा धडाका लावला आहे. याचा परिणाम बेस्टच्या स्वतःच्या सेवेवर देखील झाल्याचे बेस्ट जागृत कामगार संघटनेचे सरचिटणीस सुहास नलावडे यांनी सांगितले.
वाहतूक पोलिसांनाही ताप-
१) बस ब्रेकडाऊन झाली की, प्रवाशांसोबत वाहतूक पोलिसांनाही घटनास्थळी पोहोचावे लागते.
२) बंद पडलेली बस तत्काळ टोइंग व्हेइकलने बाजूला करून ट्रॅफिक मोकळे करताना त्यांना खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे बेस्टचे दुरुस्ती व व्यवस्थापन पथक आणि क्रेन्स सज्ज असायला हव्यात, असे त्यांचे मत आहे.