Join us

बेस्ट आहे की खटारा ! गळतीमुळे प्रवासी हैराण; प्रवाशांच्या तुलनेत बस पडतात अपुऱ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 9:56 AM

मुंबई शहर, उपनगरांत चालविण्यात येणाऱ्या बेस्टच्या मिनी बसने मुंबईकरांना अक्षरश: घाम फोडला आहे.

मुंबई : शहर, उपनगरांत चालविण्यात येणाऱ्या बेस्टच्या मिनी बसने मुंबईकरांना अक्षरश: घाम फोडला आहे. या बस आकाराने लहान असल्याने त्यांची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कमी आहे. मात्र, गर्दीच्या वेळेस या बस तुडुंब भरून जात असल्याने त्याचा प्रवाशांना त्रास होत आहे. महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात यातील अर्ध्याअधिक बस गळत असून, काही बसकडे बघून यापेक्षा एसटी बरी असे म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे. सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत मिनी बस भरभरून धावत असल्या तरी प्रवाशांच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे.

बसना लागली गळती-

भायखळ्याहून लोटस कॉलनीपर्यंत धावणाऱ्या १५४ क्रमांकांच्या मिनी बसना गळती लागली असून, पावसाळ्याचे पाणी आत येते. नेमके एसी लाइनच्या खाली पाणी गळत असल्याचे बहुतांशी बसमध्ये निदर्शनास येत आहे. 

एसी बसचे दरवाजे उघडेच-

१) लालबहादूर शास्त्री मार्ग, कमानी, जरीमरी, बैलबाजार, साकीनाका या मार्गांवर धावणाऱ्या मिनी बसमध्ये गर्दीच्या वेळी तुलनेपेक्षा अधिक गर्दी असते. परिणामी अनेक वेळा एसी बसचे दरवाजे खुलेच राहत असल्याचे निदर्शनास येत आहे.

शाळेच्या व्हॅन म्हणूनच उपयुक्त -

१) सध्या हंसा सिटी बस सर्व्हिसेसच्या ६०० कंत्राटी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस या बेस्ट उपक्रमाच्या मरोळ, दिंडोशी आणि ओशिवरा आगारांत कार्यरत आहेत. 

२) या गाड्यांमधील आसन व्यवस्थेचे एकूण आकारमान पाहता या बस केवळ शाळेतील मुलांकरिता शाळेची व्हॅन म्हणून वापरणे जास्त योग्य ठरेल. अलीकडे तर या बसची पार दुरवस्था झाली आहे.

जीव नकोसा-

१) बेस्ट उपक्रमात मोठ्या दिमाखात भाडेतत्त्वावर दाखल केलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर बसगाड्या सुरूवातीपासूनच कायम वादग्रस्त राहिलेल्या आहेत. अपुरी आसन व्यवस्था, वावरण्यास अपुरी जागा, विनावाहक सेवा, मध्येच बंद पडणारी वातानुकूलित यंत्रणा, पावसाळ्यात टपावरून आत गळणारे पाणी, अनियमित देखभाल यामुळे प्रवास करताना प्रवाशांचा जीव अगदी मेटाकुटीस येतो.

बसमधील वातानुकूलित यंत्रणा तर पार रसातळाला गेली आहे. बऱ्याचदा दार-खिडक्या उघड्या ठेवून विनावातानुकूलित म्हणून बस चालवल्या जातात. असे असतानाही प्रवाशांकडून वातानुकूलित बसचे भाडे बेस्ट उपक्रम आकारत आहे. बसची दुरवस्था इतकी आहे की, यांचे दिशादर्शक दिवेसुद्धा फुटलेले असतात. प्रवाशांच्या तक्रारी तसेच उपक्रमाच्या इभ्रतीच्या प्रश्नाखातर तरी बेस्टने बसगाड्यांचे कंत्राट तत्काळ रद्द करून त्याऐवजी स्वमालकीच्या मोठ्या आणि मिडी नव्या बसगाड्या तत्काळ खरेदी करायला हव्यात. बेस्टने प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रवासी संघटनांशी चर्चा करून तोडगा काढायला हवा. - रुपेश शेलटकर, अध्यक्ष, आपली बेस्ट आपल्याचसाठी 

टॅग्स :मुंबईपाऊसबेस्ट