भिंडेने घाटकोपर होर्डिंगचे २२ लाखांचे शुल्क थकवले; माहिती अधिकारात उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 09:53 AM2024-08-08T09:53:01+5:302024-08-08T09:55:34+5:30

मुंबई रेल्वे पोलिसांनी एका महिन्यानंतर अर्जास उत्तर देत थकबाकी रकमेची माहिती दिली. 

in mumbai bhinde exhausted a rupees of 22 lakhs to ghatkopar hoarding exposed in right to information reply from railway police after a month  | भिंडेने घाटकोपर होर्डिंगचे २२ लाखांचे शुल्क थकवले; माहिती अधिकारात उघड

भिंडेने घाटकोपर होर्डिंगचे २२ लाखांचे शुल्क थकवले; माहिती अधिकारात उघड

मुंबई :  घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी सध्या अटकेत असलेल्या भावेश भिंडे याच्या मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एप्रिल २०२४ पासून होर्डिंग दुर्घटना होईपर्यंत २१ लाख ९४ हजार रुपयांची थकबाकी भरलेली नाही. त्याचप्रमाणे दादर रेल्वे वसाहतीतील होर्डिंग्जचेही १६ लाख रुपये थकवले आहेत. 

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईरेल्वेपोलिसांकडे मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घाटकोपर आणि दादर येथील होर्डिंगच्या अदा केलेल्या आणि प्रलंबित  असलेल्या भाड्याची माहिती विचारली होती. मुंबई रेल्वे पोलिसांनी एका महिन्यानंतर अर्जास उत्तर देत थकबाकी रकमेची माहिती दिली. 
जून २०२२ ते मार्च २०२४ पर्यंत मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दोन कोटी ८१  लाख ७४  हजार २९ रुपये अदा केले. होर्डिंगचे शुल्क  प्रति महिना १३ लाख ३१ हजार २०० रुपये होते. मार्च २०२४ चे १० लाख रुपये शुल्क दोन धनादेशांद्वारे  जमा केले. पहिला धनादेश ६  मे  २०२४ ला  तर दुसरा धनादेश ७ मे २०२४ ला देण्यात आला. 

मार्च २०२४ चे तीन लाख ३१  हजार २०० रुपये अद्याप  भरलेले नाहीत. एप्रिल २०२४ चे शुल्कही दिलेले नाही. १३ मे रोजी घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना होईपर्यंत एकूण २१ लाख ९४  हजार ८८० रुपये थकबाकी आहे.

प्रलंबित रकमेवर व्याज आकारणी नाही-

मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अदा केलेल्या शुल्क रकमेचा धनादेश दिनांक लक्षात घेता शुल्क अदा करण्यात दिरंगाई होत होती, हे स्पष्ट होते. तरीही मुंबई रेल्वे पोलिसांनी प्रलंबित रकमेवर  व्याज आकारणी न करता कंपनीवर मेहरबानी केली असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला.

दादरच्या होर्डिंगचीही-

१) १६ लाखांची थकबाकी- दादर रेल्वे वसाहत येथील होर्डिंगचे शुल्कही मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने थकवले आहे. फेब्रुवारी २०२४ पासून १२ मे २०२४ पर्यंतची थकबाकी १६ लाख चार हजार ९३६ इतकी आहे. 

२) या ठिकाणच्या होर्डिंगचे शुल्क प्रति महिना पाच लाख २९ हजार १०० रुपये इतके होते. 

३) मुंबई रेल्वे पोलिसांनी कंपनीकडून घाटकोपर येथील होर्डिंगसाठी  ४० लाख रुपये अनामत रक्कम आकारली होती. दादर पोलिस वसाहत येथील होर्डिंगसाठी जमा असलेल्या अनामत रकमेची माहिती दिलेली नाही.

Web Title: in mumbai bhinde exhausted a rupees of 22 lakhs to ghatkopar hoarding exposed in right to information reply from railway police after a month 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.