जन्म, मृत्यू प्रमाणपत्र लवकरच ऑनलाइन; ‘नवी प्रणाली येईपर्यंत सहकार्य करा’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 12:06 PM2024-08-03T12:06:36+5:302024-08-03T12:10:13+5:30
महापालिका क्षेत्रातील जन्म-मृत्यू नोंदणीसाठी केंद्र सरकारच्या आधिपत्याखालील नागरी नोंदणीप्रणाली सुधारित आणि अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे.
मुंबई : महापालिका क्षेत्रातील जन्म-मृत्यू नोंदणीसाठी केंद्र सरकारच्या आधिपत्याखालील नागरी नोंदणीप्रणाली सुधारित आणि अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे. मुंबईकरांना जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र पुरवता यावेत, या हेतूने सरकारकडे सातत्याने पाठपुरावाही केला जात आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले. पालिका क्षेत्रात जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असल्याने त्यावर पालिकेने स्पष्टीकरण दिले आहे.
पालिकेच्या हद्दीतील जन्म-मृत्यू नोंदणीकरिता, सरकारच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१६ पासून नागरी नोंदणी प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. जनगणना आयुक्त कार्यालयाकडून नागरी नोंदणी प्रणालीमध्ये २४ जून २०२४ पासून सुधारणा करण्यात येत आहेत. नागरिकांना सहज, सुलभ व वेगाने प्रमाणपत्र देता यावेत, यासाठी अद्ययावत वैशिष्ट्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात येत आहे. या नवीन सुधारणांसाठी सद्य:स्थितीत होत असलेल्या तांत्रिक कामकाजामुळे या प्रणालीतून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त करताना नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. पूर्वी नागरी सुविधा केंद्र (सीएफसी)मध्ये नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे मिळत होती. मात्र, सद्य:स्थितीत सुधारित नागरी नोंदणी प्रणाली अद्ययावत केली जात असल्याने नागरी सुविधा केंद्रातही जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे नागरिकांना मिळत नाहीत, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले.
‘अचूक ई-मेल आयडी द्या’-
२४ जून २०२४ नंतर जन्म-मृत्यू झालेल्या व्यक्तींची नोंद करताना, नागरिकांनी त्यांचा अचूक ई-मेल आयडी अर्जासोबत नमूद केल्यास पालिका विभाग कार्यालयांमधील वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत त्यांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर जन्म-मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येतील. सुधारित व अद्ययावत नागरी नोंदणी प्रणालीमध्ये नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. ज्यामुळे नागरिकांना नोंदणी कार्यालयास भेट देण्याची गरज भासणार नाही, असे पालिकेकडून सांगण्यात आले.