मुंबईत भाजपला १८, शिंदेसेनेला १५, अजितदादा गटाला तीन जागा; महायुतीचा फॉर्म्युला ठरला?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 10:45 AM2024-10-20T10:45:20+5:302024-10-20T10:48:24+5:30
अजित पवार गटाकडून सना मलिक, झिशान सिद्दीकी आणि नवाब मलिक निवडणूक लढवण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभा निवडणूक जाहीर होऊन चार दिवस उलटले आहेत. मात्र, अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. अशातच मुंबईतील ३६ जागांपैकी महायुतीमधील भाजप १८, शिंदेसेना १५ तर अजित पवार गट तीन जागा लढविणार असल्याची माहिती समोर आली आहे.
२०१९ मध्ये भाजपने १७ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी १६ जागा जिंकल्या तर मालाड येथे पराभव झाला होता. यावेळी भाजपने १८ जागा लढविण्याची तयारी केली आहे. विद्यमान १६ आमदारांच्या मतदारसंघासह मालाड आणि मुंबादेवी या जागा भाजप लढविणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार गटाला अणुशक्तीनगर, वांद्रे पूर्व आणि शिवाजी मानखुर्द हे तीन विधानसभा मतदारसंघ सोडण्यात आले आहेत. अणुशक्तीनगरमधून सना मलिक, वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी आणि शिवाजीनगरमधून नवाब मलिक निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. शिंदेसेनेचे मुंबईत सहा आमदार असले तरी शिंदेसेनेला १५ जागा देण्यात आल्या आहेत. शिंदेसेनेच्या उमेदवारांची लढत उद्धवसेनेच्या उमेदवाराविरोधात होणार अशी चर्चा आहे. येत्या सोमवारी महायुतीचे नेते जागावाटपाची घोषणा करतील, असे या सूत्रांनी सांगितले.