मुंबई : भाजपच्या नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयाला रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने अवघ्या १५ मिनिटांत ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कायम वर्दळ असलेल्या भाजप प्रदेश कार्यालयात रविवार असल्याने डागडुजीचे काम सुरू होते. किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना आग लागली. कार्यालयातील कागदपत्रे आणि फर्निचर यामुळे आग क्षणार्धात पसरली. धुराच्या लोटांमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीमुळे कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. आगीचे वृत्त समजताच पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आतमध्ये होते १०० लोक, तत्काळ काढले बाहेर आगीची माहिती मिळाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार प्रसाद लाड कार्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नार्वेकर म्हणाले, आग लागली तेव्हा सुमारे १०० लोक आत होती. मात्र त्यांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाने वेळीच आग नियंत्रणात आणली, त्यामुळे नुकसान झाले नाही. नुकसानीचा नंतर आढावा घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
ही आग मुख्य कार्यालयात लागली नसून कार्यालयाच्या मागच्या बाजूस लागली होती. त्यामुळे कार्यालयाचे फार नुकसान झालेले नाही. कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मंडपात कर्मचारी काम करीत असताना आग लागली. सोमवारी सकाळपासून पुन्हा कार्यालय सुरू होईल.- आ. प्रसाद लाड, प्रवक्ते, भाजप.