Join us  

मेट्रो ‘२ बी’च्या मार्गात म्हाडा इमारतींचे अडथळे, काम रखडले; तोडगा न निघाल्यास भूसंपादन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 10:26 AM

येत्या काही दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास एमएमआरडीएकडून या इमारतींच्या जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

मुंबई : मंडाले ते डी. एन. नगर मेट्रो २ बी मार्गिकेच्या कामात अडथळा ठरणाऱ्या नेहरूनगर आणि जेव्हीपीडी येथील म्हाडाच्या इमारती अद्याप मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ताब्यात आल्या नाहीत. त्यातून या भागातील मार्गिकेच्या उभारणीचे काम रखडले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास एमएमआरडीएकडून या इमारतींच्या जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

मेट्रो २ बी मार्गिकेला नेहरूनगर येथील अजिंक्यतारा रहिवासी सोसायटी आणि जेव्हीपीडी येथील गुलमोहर सोसायटी या दोन इमारती अडथळा ठरत आहेत. त्यातील अजिंक्यतारा इमारतीत १२० रहिवासी, तर गुलमोहर सोसायटीत ४० रहिवासी वास्तव्याला आहेत. या इमारतींचा पुनर्विकास म्हाडाने करावा यासाठी एमएमआरडीएकडून प्रयत्न केले जात होते. 

‘या’ कारणांमुळे विलंब-

१) सद्य:स्थितीत या मेट्रो मार्गिकेचे ६८ टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, या इमारती रिकाम्या झाल्या नसल्याने या भागातील मार्गिकेचे काम करणे एमएमआरडीला शक्य झाले नाही.

२) एमएमआरडीएच्या २०२० मधील नियोजनानुसार मेट्रो २ बी मार्गिकेचे काम ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. या मेट्रो मार्गिकेसाठी काही जागा मिळण्यात आलेल्या अडचणी, कंत्राटदार बदलावा लागल्याने प्रकल्पाला विलंब झाला आहे. अद्यापही मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होण्यास जून २०२५ उजाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

इमारती अद्याप रिकाम्या केलेल्या नाहीत- इमारतींच्या या पुनर्विकासाला रहिवाशांनी विरोध दर्शविला होता. नेहरूनगर येथील इमारत रहिवाशांनी स्वतः पुनर्विकास करण्याचे ठरविले होते. मात्र हा प्रकल्प अद्याप मार्गी लागला नसल्याने या दोन्ही इमारती अद्याप रिकाम्या केलेल्या नाहीत. मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी आवश्यक असलेली या भागातील जागा अद्याप एमएमआरडीएच्या ताब्यात आलेली नाही. त्यातून आता प्रकल्प पूर्णत्वासाठी एमएमआरडीएकडून ही जमीन अधिग्रहण केली जाणार आहे. तशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :मुंबईमेट्रोम्हाडाएमएमआरडीए