मुंबई : ‘फेरीवालामुक्त परिसर’ या अंतर्गत मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरभरात कारवायांचा धडाका लावला आहे. गेल्या सात दिवसांत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाया करून ३ हजार साधनसामग्री जप्त केली आहे. त्यात ७१३ हातगाड्या, १ हजार ३७ घरगुती गॅस सिलिंडर आणि १ हजार २४६ व इतर विविध प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे.
मुंबईकर नागरिकांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणाऱ्या, आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात सातत्याने कारवाई केली जाते. मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाया करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन आणि मुंबई पोलिस यांची संयुक्त बैठक पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या सभागृहात पार पडली.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणांवर कठोर करावी ; फेरीवालामुक्त मुंबई करून नागरिकांची वाट मोकळी करून देण्यासाठी पदपथावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाया करा, अशा सूचना गगराणी यांनी दिल्या. त्यानुसार, अतिक्रमण निर्मूलन कारवाईला सुरुवात केली आहे.
मुंबईतील नागरिकांना पदपथ सहजपणे वापरता यावेत, रस्त्यांवरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पदपथ अतिक्रमणमुक्त राहतील, या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईतील पदपथ नागरिकांना वापरासाठी नियमितपणे उपलब्ध राहावेत. आरोग्याच्या दृष्टीने दर्जेदार अन्न मुंबईकरांना मिळावे, उघड्यावर व अस्वच्छ अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर वचक राहण्यासाठी सातत्याने कारवाया करण्यात येणार आहेत.- किरण दिघावकर, उपायुक्त (विशेष)