Join us  

मुंबई होणार ‘एव्हरग्रीन’; मोकळ्या जागा, मैदाने, उद्यानांमध्ये होणार वृक्षलागवड 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 9:18 AM

मुंबई शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.

लोकमत न्यूज  नेटवर्क, मुंबई : मुंबई शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर सुधारली आहे. मात्र, तरीही प्रदूषणाला आणखी आळा घालण्यासाठी आता वृक्षारोपणाची मोहीम हाती राबविली जाणार आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. 

मियावाकी आणि पारंपरिक वृक्षांची लागवड केली जाणार असून, पारंपरिक वृक्षांमध्ये दुर्मीळ जातींच्या वृक्षांचाही समावेश असणार आहे.  वाढते प्रदूषण ही मुंबई पालिकेपुढील मोठे आव्हान आहे. या प्रदूषणाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. मुंबईत सध्या अनेक प्रकल्प सुरू आहेत, यापैकी काही  प्रकल्पांमुळे प्रदूषणात भर पडत असल्याचा ठपका ठेवला होता. 

जागा केल्या निश्चित-

१) उपाययोजना सुरू असताना उद्यान विभागाने वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे. 

२)  जेवढे वृक्ष जास्त, तेवढे प्रदूषण कमी असे समीकरण असल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दोन प्रकारे लागवड होईल.

३)  जपानी धर्तीवरील मियावाकी वृक्ष आणि पारंपरिक भारतीय वृक्ष अशी लागवड होणार आहे. त्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत. 

४) मोकळ्या जागा, उद्याने, मैदानाच्या कडेचा भाग, मनोरंजन मैदाने या ठिकाणी वृक्षलागवड होणार आहे.

५) ४,४१६ भारतीय वृक्षांची लागवड केली जाणार आहे. 

६) २६ ठिकाणी ३३ हजार ७५० मियावाकी वृक्षांची लागवड होईल. 

७) बकुळ, ताम्हण,  चिंच, सागवान, बहावा, निम, कांचन, आंबा, भोकर वृक्षांच्या जातीचा समावेश आहे.

स्वच्छता मोहीम-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानंतर पालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली. रस्त्यावर पाणी मारणे, दुभाजक स्वच्छता, या धर्तीवर ही मोहीम सुरू झाली होती. प्रदूषण करणाऱ्या बांधकामांसाठी नियमावलीही जाहीर केली होती. 

नियमांचा भंग करणाऱ्या बांधकामांवर कारवाईही करण्यात आली होती. हिवाळा सुरू झाला की प्रदूषण पुन्हा वाढते हा अनुभव लक्षात घेता पुन्हा या मार्गदर्शन सूचनांचे स्मरण पालिकेने केले आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाप्रदूषण