गणेशोत्सवाआधी खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी पालिकेची मोहीम; जूनपासून बुजवले २० हजार खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 10:50 AM2024-08-31T10:50:19+5:302024-08-31T10:53:50+5:30

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनादरम्यान खड्ड्यांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पालिकेने खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे.

in mumbai bmc campaign to clear potholes before ganeshotsav 20 thousand potholes have been filled since june | गणेशोत्सवाआधी खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी पालिकेची मोहीम; जूनपासून बुजवले २० हजार खड्डे

गणेशोत्सवाआधी खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी पालिकेची मोहीम; जूनपासून बुजवले २० हजार खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनादरम्यान खड्ड्यांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पालिकेने खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे. तक्रार आल्यानंतर त्याप्रमाणे पुढच्या दोन तासांत महापालिकेने बुजविलेल्या खड्ड्यांची संख्या १० हजार आहे.

गणेशोत्सवाच्या आगमन-विसर्जन रस्त्यावरील खड्ड्यांवर तात्काळ कार्यवाहीच्या सूचना पालिकेचे अतिरिक्त  आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर रस्त्यावर मास्टिक कूकरची संख्या पुन्हा वाढवल्याची माहिती बांगर यांनी दिली. यासाठी दुय्यम अभियंत्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना  केल्या आहेत, तसेच यामध्ये हयगय केल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे. 

पालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागामार्फत खड्डेमुक्त रस्त्यांसाठी २२७ नागरी संस्था प्रभागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे २२७ दुय्यम अभियंत्याची नेमणूक केली आहे. दुय्यम अभियंता नेमून दिलेल्या विभागात रस्त्यांची पाहणी करून खड्डे आढळल्यास ते मास्टिक पद्धतीने बुजवत आहेत.  दुय्यम अभियंत्यांबरोबरीने सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उपप्रमुख अभियंता यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाऊन रस्त्यांची पाहणी करण्याची सूचना बांगर यांनी दिल्या आहेत. 

जूनपासून बुजवले २० हजार खड्डे -

१) जूनपासून पालिकेच्या मोबाइल ॲप, डॅशबोर्डवर खड्ड्यांच्या एकूण २० हजार ५१९ तक्रारी प्राप्त झाल्या. 

२) यामधील २० हजार १५१ तक्रारी सोडवल्या आहेत. उर्वरीत तक्रारी लवकरच सोडविल्या जाणार आहेत. 

खड्डेमुक्तीसाठी मास्टिक-

यंदा खड्डे दुरुस्तीसाठी मास्टिक वापरले जात आहे. सर्व विभागांतील मास्टिक कूकर हे सुस्थितीत तसेच वापरासाठी उपलब्ध असावेत, याची खातरजमा विभागीय पातळीवर करावी, असे बांगर यांनी स्पष्ट केले आहे. सर्व कंत्राटदारांना मास्टिकचे उत्पादन व उपलब्धता, आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होईल, यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.

Web Title: in mumbai bmc campaign to clear potholes before ganeshotsav 20 thousand potholes have been filled since june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.