मुंबईकरांना दिलासा; हवेची गुणवत्ता सुधारली, स्वच्छता मोहिमेचे यश- पालिकेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 10:40 AM2024-04-05T10:40:43+5:302024-04-05T10:41:18+5:30
महानगरपालिकेने हाती घेतलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक सातत्याने १००च्या खाली नोंदविला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
मुंबई : महानगरपालिकेने हाती घेतलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक सातत्याने १००च्या खाली नोंदविला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. काही भागांमध्ये हा निर्देशांक जवळपास ७० पर्यंत नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे सखोल स्वच्छता मोहिमेत रस्ते स्वच्छ धुतल्याने हवेतील धूलिकण कमी होऊन वायू गुणवत्ता सुधारल्याचे पालिकेने म्हटले आहे. शिवाय मुंबईतील वायू प्रदूषणात लक्षणीयरीत्या घट झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रशासकीय विभागांमध्ये डिसेंबर २०२३ पासून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, सलग १८ आठवड्यांपासून हे काम सुरू आहे. काही विभागांत महिन्यातून एकदा, तर काही विभागांत दोन महिन्यांतून एकदा सखोल स्वच्छता राबवली जात आहे. सार्वजनिक स्वच्छतेचा स्तर आणखी उंचावल्याचा दावा पालिका प्रशासन करत आहे.
सखोल स्वच्छता मोहिमेसाठी महापालिकेतर्फे ६१ मुद्दे असलेली प्रमाणित कार्यपद्धती तयार केली असून, याचे काटेकोरपणे पालन केले जात असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
५५६ किलोमीटर रस्ते धुतले-
१) ३० मार्च रोजी देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागात सखोल स्वच्छता मोहीम राबविली गेली.
२) यात १४७७ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. महापालिकेच्या वेगवेगळ्या संयंत्रांचाही वापर करण्यात आला.
३) सुमारे ५५६ किलोमीटर इतक्या लांबीचे रस्ते धुऊन स्वच्छ करण्यात आले.
४) या दरम्यान ७० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन झाले. १.५९ टन इतकी माती उचलण्यात आली.
५) १०६.४ मेट्रिक टन राडारोडा उचलण्यात आला.